मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. पराभवामुळे ही स्पर्धा जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला आता पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागले आहे. अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार विराट कोहलीवरही जोरदार टीका होत आहे. एवढेच नाही तर बीसीसीआय लवकरच विराटबाबत मोठा निर्णय घेणार आहे.
ICC T20 विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामन्यांमध्ये भारताच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) निराश झाले आहे. त्याचवेळी या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही तर विराट कोहलीला त्याच्या वनडे संघाचे कर्णधारपदही गमवावे लागू शकते. कोहलीने याआधी टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यूएईमध्ये भारताच्या खराब कामगिरीनंतर त्याचे वनडेत कर्णधारपद कायम ठेवायचे की नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, एका सूत्राने सांगितले की, "बोर्ड सध्या नाखूष आहे आणि आता विराटचं कर्णधारपद वनडेमध्ये ही कायम राहणार का यावर शंका उपस्थित केली जात आहे." मात्र स्पर्धेत अजून तीन सामने बाकी आहेत. यामध्ये भारताने कोणत्याही प्रकारे विजय मिळवला तर निर्णय बदलू शकतो. रोहित शर्माला जबाबदारी देण्याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, 'कोणाचेही नाव घेणे घाईचे ठरेल, T20 विश्वचषक संपू द्या. राहुल द्रविडही लवकरच मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात सामील होऊ शकतो. याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली जाईल.
रोहित की आणखी कोणी, की विराट कर्णधारपदी कायम राहणार हे नंतर ठरवले जाईल. T20 आणि ODI फॉरमॅटसाठी भारताला वेगळा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. तर कसोटी क्रिकेटसाठी विराटकडेच कर्णधारपद कायम राहण्याची शक्यता आहे. कोहलीने आतापर्यंत चार आयसीसी स्पर्धांमध्ये नेतृत्व केले आहे, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 विश्वचषक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) आणि सध्याचा T20 वर्ल्ड कप. या सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये भारताला एकही विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे.