'...तर मग खूप मोठा वाद होईल', रोहित शर्मा स्पष्टच बोलला; VIDEO व्हायरल

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) एका कार्यक्रमात पाकिस्तानी गोलंदाजांबद्दल (Pakistani Bowelrs) विचारण्यात आलं. यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं, जे ऐकून उपस्थितांना हसू अनावर झालं होतं. रोहित शर्माला तुला पाकिस्तानचा कोणता गोलंदाज सर्वाधिक आव्हानात्मक वाटतो असं विचारण्यात आलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Aug 8, 2023, 01:32 PM IST
'...तर मग खूप मोठा वाद होईल', रोहित शर्मा स्पष्टच बोलला; VIDEO व्हायरल title=

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानात आणि मैदानाबाहेरही रोहित शर्माचा हा स्वभाव दिसत असतो. खासकरुन पत्रकार परिषदेत जेव्हा त्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले जातात, तेव्हा तो अत्यंत मोकळेपणाने त्यावर जे काही वाटतं ते सांगून टाकतो. त्याचे असे अनेक व्हिडीओही व्हायरल झाला आहेत. दरम्यान, नुकतंच एका कार्यक्रमात पुन्हा एकदा त्याने आपल्या या स्वभावाचं दर्शन घडवताना असं काही उत्तर दिलं की, उपस्थितांना हसू अनावर झालं होतं. 

रोहित शर्मा अमेरिकेतील एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याला क्रिकेटसंबंधी अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये आगामी आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषकासंबंधीही विचारण्यात आलं. यावेळी त्याला एक प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं. रोहित शर्माला विचारण्यात आलं की, तुला पाकिस्तानचा कोणता गोलंदाज सर्वाधिक आव्हानात्मक वाटतो? यावर रोहित शर्मा काहीवेळ शांत राहिला आणि नंतर आपल्या स्वभावाप्रमाणे त्यावर भन्नाट उत्तर दिलं. 

रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांसंबंधी प्रश्नावर उत्तर दिलं की, "पाकिस्तानचे सर्वच गोलंदाज चांगले आहेत. असं काही नाही. मी कोणाचं नाव घेणार नाही. अन्य़था खूप मोठा वाद होईल. मी कोणाचं नाव घेणार नाही, एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला वाईट वाटेल. सर्वजण चांगले खेळाडू आहेत". रोहित शर्माने दिलेलं हे उत्तर ऐकून उपस्थित प्रेक्षक जोरजोरात हसू लागले. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची पत्नी रितिकालाही हसू अनावर होत होतं. 

रोहित शर्माला पाकिस्तानी खेळाडूंसंबंधी याआधीही प्रश्न विचारण्यात आले होते. 2019 वर्ल्डकपदरम्यान, एका पत्रकाराने रोहित शर्माला पाकिस्तान संघाला काय सल्ला देशील असं विचारलं होतं. त्यावर रोहितने उत्तर दिलं होतं की, "मी त्यांना काय सल्ले देणार. जेव्हा कधी मी पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक होईन तेव्हा सांगेन". रोहित शर्माचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

रोहित शर्माला विश्रांती

भारतीय संघ सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळल्यानंतर सध्या ब्रेकवर आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरोधात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यादरम्यान हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, रोहित शर्मा आता आशिया कपदरम्यान मैदानात उतरणार आहे.