लंडन: भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपये बुडवून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने शुक्रवारी भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना पाहण्यासाठी हजेरी लावली. केनिंग्टन येथील ओव्हल मैदानावर भारत-इंग्लंड यांच्यात शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. यादरम्यान, विजय मल्ल्या ओव्हल स्टेडियममध्ये प्रवेश करतानाचा व्हीडिओ एएनआय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे.
#WATCH: Vijay Mallya seen entering The Oval cricket ground in London's Kenington. The 5th test match between India and England is being played at the cricket ground. #England pic.twitter.com/NA3RQOKkRJ
— ANI (@ANI) September 7, 2018
भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये सध्या मल्ल्याच्या प्रत्यापर्णासाठी बोलणी सुरु आहेत. त्यादृष्टीने लंडनच्या न्यायालयाने आर्थर रोड कारागृहातील व्हीडिओही मागवला होता. भारतात परत पाठविल्यास आपल्याला आॅर्थर रोड कारागृहात ठेवण्याची योजना आहे. परंतु त्या तुरुंगातील स्थिती अमानवीय आहे, असा युक्तिवाद मल्ल्यातर्फे करण्यात आला होता. विजय मल्याच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 कोटी रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. विजय मल्याने देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र त्याअगोदरच मल्ल्या देश सोडून पसार झाला होता.