बंगळुरू : रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सौराष्ट्रनं कर्नाटकविरुद्ध ७ विकेट गमावून २२७ धावा केल्या आहेत. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या या मॅचमध्ये सौराष्ट्रचा अर्पित वसावाडा २६ धावांवर नाबाद खेळत आहे. कर्नाटकनं त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये श्रेयस गोपाल (८७), श्रीनिवास शरथ(८३) आणि कर्णधार मनिष पांडे(६२) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे २७५ धावा केल्या. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर कमलेश मकवाणाला ३, धर्मेंद्र जडेजाला २ आणि चेतन सकारियाला १ विकेट मिळाली. यानंतर बॅटिंगला आलेल्या सौराष्ट्रची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मोठी खेळी करता आली नाही. पुजारा ४५ धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा बॅटिंग करत असताना मनिष पांडेनं त्याचं स्लेजिंग केलं. या स्लेजिंगचं पुजारानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
सौराष्ट्रच्या विकेट जात असताना चेतेश्वर पुजारा किल्ला लढवत होता आणि कर्नाटकवरचा दबाव वाढवत होता. ४७व्या ओव्हरदरम्यान स्लिपमध्ये फिल्डिंग करणाऱ्या मनिष पांडेनं पुजाराला स्लेजिंग करायला सुरुवात केली. पण पुजारानं स्वत:चं लक्ष विचलीत होऊ दिलं नाही. ४७व्या ओव्हरमध्ये श्रेयस गोपाल बॉलिंगला आला तेव्हा मनिष पांडेनं पुजाराला चिडवलं. एक खराब शॉट मारून पुजारा आऊट होईल, असं मनिष पांडे म्हणाला. मनिष पांडेनं स्लेजिंग केल्यानंतर लगेचच पुढच्याच बॉलला चेतेश्वर पुजारानं श्रेयस गोपालला सिक्स मारली.
— Mushfiqur Fan (@NaaginDance) January 25, 2019
मनिष पांडेच्या स्लेजिंगचं उत्तर पुजारानं सिक्स मारून दिलं. या सिक्समुळे पुजाराचा स्कोअर ३५ धावांवर पोहोचला. पण यानंतर मात्र पुजारा ४५ धावांवर बाद झाला. अभिमन्यू मिथुननं पुजाराची विकेट घेतली. सौराष्ट्रची टीम अजूनही या सामन्यात पिछाडीवर आहे. कर्नाटकच्या रोनित मोरनं सर्वाधिक ५ विकेट घेतल्या आहेत.