Dhoni Gave Lift To Fan: भारताचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रिमिअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा बाईक्सचा किती मोठा चाहता आहे हे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्याच्या रांची येथील घरामध्ये बाईक कलेक्शनसाठी मोठं गॅरेज आहे. मध्यंतरी भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने या गॅरेजचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. अनेकदा धोनी त्याच्या बाईक्सवरुन रांचीच्या रस्त्यावर फिरताना दिसतो. धोनीची एक झलक मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतानाच एखाद्याला धोनीने स्वत: बाईकवर लिफ्ट दिल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण खरोखर असं घडलं आहे.
धोनी ज्या रांची शहरामध्ये वास्तव्यास आहे तेथील एका क्रिकेट चाहत्याचं भाग्य उजळल्याची चर्चा एका व्हायरल व्हिडीओमुळे सुरु आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये या तरुणाने धोनीने आपल्याला त्याच्या बाईकवरुन लिफ्ट दिल्याचं सांगणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अर्थात या व्हिडीओमध्ये हेल्मेट घालून बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचा म्हणजेच कथित स्वरुपात धोनीचा चेहरा दिसत नाही मात्र व्हिडीओच्या सुरुवातीला या तरुणाच्या मागे मैदानावर धोनी सामानाची आवराआवर करताना दिसतोय. व्हिडीओमध्ये हा तरुण या बाईकस्वाराच्या मागे बसल्याचं दिसत आहे. सेल्फी व्हिडीओ दुचाकीवर बसून शूट करण्यात आला असून धोनी आपली यमाहा आरडी 350 चालवताना दिसत आहे. या बाईकची किंमत 1 लाखाहूनही अधिक आहे. धोनी बाईक चालवत असताना दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेला हा तरुण आजूबाजूचे रस्ते आणि इतर दृष्य दाखवताना दिसतो.
"काही विशेष नाही धोनी आपली अर्धी निवृत्ती एन्जॉय करत आहे. एका तरुण क्रिकेटपटूला त्याच्या यामाहा आरडी 350 वर लिफ्ट मिळाली," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
Nothing to see here. Just #MSDhoni living his best semi retired life and a very lucky young cricketer who got a lift on his #YAMAHA RD350. #Jharkhand #Dhoni #msd #mahi #ranchi pic.twitter.com/EipYkBptsU
— Jharkhand Jatra (@JharkhandJatraa) September 15, 2023
धोनीच्या बाईक कलेक्शनमध्ये सर्वात महागडी बाईक ही कॉन्फेडरेट हेलकॅट एक्स 132 आहे. या बाईकची किंमत 47 लाख रुपये इतकी आहे. याचबरोबर धोनीकडे ड्युकाटी 1098 बाईकही असून तिची किंमत 35 लाख रुपये आहे. या शिवाय धोनीकडे 36 लाखांची कवासाकी निंजा एचटू, हार्ली-डेव्हिडसन फॅट बॉय ही 22 लाखांची बाईकही धोनीकडे आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे सुझुकी हायाबुसा ही 16 लाख 20 हजारांची महागडी बाईकही आहे.