U-19 World Cup: 'यशस्वी' कामगिरी, मुंबईकर जयस्वालने केले हे विक्रम

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही भारताचा खेळाडू यशस्वी जयस्वालने उल्लेखनीय कामगिरी केली.

Updated: Feb 9, 2020, 09:37 PM IST
U-19 World Cup: 'यशस्वी' कामगिरी, मुंबईकर जयस्वालने केले हे विक्रम title=

मुंबई : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही भारताचा खेळाडू यशस्वी जयस्वालने उल्लेखनीय कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धच्या या मॅचमध्ये जयस्वालने ८८ रनची खेळी केली. याचसोबत यशस्वी जयस्वालने यंदाच्या स्पर्धेत ४०० रन केल्या. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम जयस्वालने केला आहे. यशस्वी जयस्वालने ६ इनिंगमध्ये ८८, १०५ नाबाद, ६२, ५७ नाबाद, २९ नाबाद आणि ५९ रन केल्या.

यशस्वी जयस्वालने या वर्ल्ड कपमध्ये ५ वेळा ५० हून अधिक रन केल्या. अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ५ अर्धशतकं करणारा यशस्वी तिसरा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट विलियम्सने १९८८ साली आणि भारताच्या सरफराज खानने २०१६ साली हा विक्रम केला होता. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये ५ पेक्षा जास्त अर्धशतकं करण्याचा विक्रम कोणत्याच खेळाडूला जमला नाही. शिखर धवनने अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये ४ वेळा ५० पेक्षा जास्त रन केले होते. यशस्वीने शिखरचा हा विक्रमही मागे टाकला. 

या वर्ल्ड कपमध्ये यशस्वी जयस्वालने एकूण १० सिक्स मारले. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रमही जयस्वालच्या नावावर झाला आहे. झिम्बाब्वेच्या ताडीवानशे मारुमणीने यंदा १० सिक्स मारले. संजू सॅमसन हा एका अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय खेळाडू आहे. संजू सॅमसनने २०१४ वर्ल्ड कपमध्ये १२ सिक्स मारले होते. तर एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॅक बर्नहॅमच्या नावावर आहे. बर्नहॅमने २०१६ सालच्या वर्ल्ड कपमध्ये १५ सिक्स मारले होते.