कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटर उमर अकमल कारवाई करत तीन मॅचेसची बंदी घातली आहे.
आचारसंहितेतील कलमांचा भंग केल्याप्रकरणी पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमल याच्यावर तीन मॅचेसची बंदी घालण्यात आली आहे. तसेच दहा लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष नज्म सेठी यांनी चौकशी समितीने केलेल्या सिफारशींनंतर अकमलवर कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे आता अकमलला दोन महिन्यांपर्यंत कुठल्याही विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी दिली जाणारी परवानगी पत्रही दिलं जाणार नाही. त्यामुळे उमर अकमल आता दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरोधात टी-२० लीगमध्ये खेळू शकणार नाहीये.
पाकिस्तानमधील क्रिकेट अकादमीत प्रॅक्टीस करताना पाकिस्तान टीमचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्यासोबत अकमलची बाचाबाची झाली होती. त्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीला अकमल दोषी आढळला होता.