आयपीएल कुठे होणार? बीसीसीआयपुढे या दोन देशांचा पर्याय

पुढच्या वर्षी होणारी आयपीएल बाहेरच्या देशात हलवण्यासाठी बीसीसीआयनं हालचाली सुरु केल्या आहेत. 

Updated: Oct 22, 2018, 09:57 PM IST
आयपीएल कुठे होणार? बीसीसीआयपुढे या दोन देशांचा पर्याय  title=

मुंबई : पुढच्या वर्षी होणारी आयपीएल बाहेरच्या देशात हलवण्यासाठी बीसीसीआयनं हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी बीसीसीआय दोन जणांची टीम दक्षिण आफ्रिकेला पाठवणार आहे. हेमांग अमित आणि नवनीत कौर येत्या एक ते दोन दिवसात दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. जोहान्सबर्ग, केप टाऊन, डरबन आणि पोर्ट एलिझाबेथ याठिकाणांची रेकी करणार आहे. याआधी २००९ सालीही दक्षिण आफ्रिकेत आयपीएल स्पर्धा झाली होती. त्यामुळे २०१९ सालची आयपीएलही दक्षिण आफ्रिकेत घेण्यात यावी, असं आवाहन क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं केलं होतं.

बीसीसीआयकडे सध्या दक्षिण आफ्रिका आणि युएई या दोन देशांचे पर्याय आहेत. पण निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत बीसीसीआय याबद्दल कोणताही निर्णय घेणार नाही. २०१४ प्रमाणेच २०१९ ला १५ एप्रिलपासून निवडणुका सुरू झाल्या तर पहिले २० सामने भारतात, नंतरचे २० सामने परदेशात आणि उरलेले २० सामने पुन्हा भारतात खेळवले जातील, असा अंदाज आहे.

पण जर निवडणुका मुदतपूर्व घेण्यात आल्या तर मात्र संपूर्ण स्पर्धा युएई किंवा दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात येऊ शकते. दक्षिण आफ्रिकेला जाऊन आल्यानंतर हेमांग अमित आणि नवनीत कौर हे युएईलाही जाणार आहेत. तिकडे दोघं एमिरत्स क्रिकेट बोर्डाबरोबर चर्चा करतील.