Jay Shah On New India Head Coach : यंदाच्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2024) भारतानं शानदार कामगिरी केली अन् फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवून टी20 विश्वचषकाच्या ट्राफीवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या विजयात हेड होच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा मोलाचा वाटा होता. आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसोबतच राहुल द्रविड यांचा टीम इंडियासोबतचा प्रवास संपला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला नवे मुख्य प्रशिक्षक (New India Head Coach) मिळतील. अशातच आता बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी मोठी माहिती दिली आहे.
राहुल द्रविड यांचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. अशातच आता जय शहा यांनी पीटीआयला महत्त्वाची माहिती दिली. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने भारताच्या नवीन प्रशिक्षकाची मुलाखत घेतली होती. या समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी दोन उमेदवारांची निवड केली आहे, अशी माहिती जय शहा यांनी दिली आहे. त्यापैकी एकाचं नाव लवकरच निश्चित केलं जाईल, असंही जय शहा म्हणाले. श्रीलंका मालिकेपूर्वी भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळेल, असंही जय शहा म्हणाले.
बीसीसीआय (BCCI) आणि गौतम गंभीर यांच्यात बोलणं झालं असून लवकर गौतम गंभीरला टीम इंडियाचा हेड कोच बनवलं जाईल, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली होती. क्रिकेट सल्लागार समितीने भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांचे नावही शॉर्टलिस्ट केल्याचं देखील समोर येतंय. त्यामुळे आता बीसीसीआय कधी घोषणा करणार, यावर सर्वांचं लक्ष लागलंय.
दरम्यान, बीसीसीआय टीम इंडियाच्या वर्ल्ड कपच्या कामगिरीवर खुश असल्याचं पहायला मिळतंय. बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी टीम इंडियाचं अभिनंदन करत बक्षिस जाहीर केलंय. जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली. टीम इंडियाला तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर करण्यात आलंय.
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी होणार आहे. यानंतर दुसरा T20 सामना 28 जुलैला आणि तिसरा आणि शेवटचा T20 सामना 30 जुलैला खेळवला जाईल. त्यानंतर श्रीलंकेत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत ही मालिका खेळवली जाईल.