व्हिडिओ: प्रवेशबंदी केली म्हणून मैदानावर क्रेनच घेऊन आला चाहता

 क्रेन बुक करण्यापूर्वी त्याने पोलिस प्रशासनासोबत बोलणे केले होते. तसेच परवानगीही मागितली होती.

Updated: May 3, 2018, 12:46 PM IST
व्हिडिओ: प्रवेशबंदी केली म्हणून मैदानावर क्रेनच घेऊन आला चाहता title=

नवी दिल्ली: खेळावरचे आपले प्रेम दाखविण्यासाठी चाहते कोणत्या थराला जातील याचा काहीच नेम नसतो. तुर्कीच्या फुटबॉल मैदानावरही असाच काही नजारा पहायला मिळाला. काही कारणामुळे एका चाहत्याला व्यवस्थापनाने मैदानात प्रवेशबंदी केली. तर, सामना पहायचाच या हट्टाने पेटलेल्या एका चाहत्याने एक अनोखीच शक्कल लढवली. हा पठ्ठा चक्क क्रेन घेऊनच मैदानावर पोहोचला. 

हा चाहता तुर्कीच्या डिनिजिस्पोर फुटबॉल क्लबचा फॅन असून, अली डेमिरकाया असे या चाहत्याचे नाव असल्याचे समजते. या चाहत्यावर डेनिजली अतातुर्क स्टेडियममध्ये गैरवर्तन केल्याबद्धल एक वर्षाची बंदी होती. पण, अली डेमरकायाला काही केल्या हा सामनाच पहायचा होता. त्यासाठी त्याने एक क्रेन बुक केली आणि तो स्टेडियमच्या भींतीपेक्षाही उंच गेला.

सुरू असलेला सामना जेव्हा तो उंचावरून पाहू लागला तेव्हा स्टेडियममध्ये बसलेले सगळेच प्रेक्षक अवाक झाले. सामना सोडून ते या चाहत्यालाच पहायला लागले. तसेच, जोरजोराने ओरडायलाही लागले. या पठ्ठ्याही क्रेनवर उभा राहून सामना आणि प्रेक्षकांचा गोंधळ अशी दोन्ही प्रकारची मजा पहात उभा राहिला. विशेष असे की, क्रेन बुक करण्यापूर्वी त्याने पोलिस प्रशासनासोबत बोलणे केले होते. तसेच परवानगीही मागितली होती.प्राप्त माहितीनुसार अलीवर १२ महिन्यांची बंदी होती.