ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी गुरुवारी इंग्लडचा डाव संपूर्ण अडखळला. इंग्लंडने पहिल्या डावात २०.४ ओव्हरमध्ये १० विकेट गमावताना केवळ ५८ धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कर्णधाराचा हा निर्णय़ त्याच्या पथ्यावर पडला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांनी शानदार कामगिरी करताना इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले.
इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला बोल्ट आणि साऊदीच्या तुफानी गोलंदाजीचा सामना करता आला नाही. ट्रेंट बोल्टने १०.४ ओव्हरमध्ये ३२ धावा देताना ६ विकेट मिळवल्या. यात त्याने ३ मेडन ओव्हर टाकल्या. तर टीम साऊदीने १० ओव्हरमध्ये तीन मेडनसह २५ धावा देत ४ विकेट मिळवल्या.
इंग्लंडकडून सी ओव्हरटनने सर्वाधिक ३३ धावा केल्या. यात त्याने १ षटकार आणि ५ चौकार लगावले. ओव्हरटनव्यतिरिक्त अॅलेस्टर कुकने २१ चेंडूत ५, मार्क स्टोनमॅनने २० चेंडूत ११, डेविड मलनने ६ चेंडूत २, क्रेग ओव्हरटनने १४ चेंडूत १६ आणि जेम्स अँडरसन ११ चेंडूत १ धाव केली.