मुंबई: जगभरात कोरोनाचं तीव्र संकट असताना बायो बबल आणि सगळी काळजी घेऊन स्पर्धा होत आहेत. सगळी काळजी घेऊन टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. शुक्रवारपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे. या खेळावरही कोरोनाचं संकट आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात यंदा भारताचे 30 खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्या खेळाडूंची स्पर्धा समारंभाच्या दुसऱ्या दिवशी आहे त्या खेळाडूंना उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी बंदी असणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि खेळाडूंची स्पर्धा चुकू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.
ऑलिम्पिक खेळाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. कोणताही कोरोनाचा धोका होणार नाही ही काळजी घेणं सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे उद्घाटन समारंभासाठी सर्व खेळाडूंपैकी केवळ 50 जणांना उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये अधिकारी आणि खेळाडू असे मिळून 50 जणच सहभागी होऊ शकणार आहेत.
भारताकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये 125 खेळाडू सहभागी होणार आहेत. तर अधिकारी, सहयोगी स्टाफ, कोच आणि खेळाडू मिळून ही संख्या 228 सदस्य सहभागी झाले आहेत. नेमबाज सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, इलावेनिल वालारिवान, अपूर्वी चंदेला हे खेळाडू पहिल्याच दिवशी मैदानात खेळण्यासाठी उतरणार असल्यानं उद्घाटन समारंभात सहभागी होऊ शकणार नाहीत.