I Will Meet You Directly In Pakistan Says Bangladeshi Player: बांगलादेशमध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या राजकीय सत्तासंघर्षाची धग कमी झाली असली तरी पूर्णपणे शांत झालेली नाही. हंगामी सरकारच्या नेतृत्वाखाली कारभार सुरु झाला असला तरी भारताच्या शेजारच्या या देशातील परिस्थिती पूर्वव्रत होण्यास बराच वेळ लागणार असल्याचं चित्र दिसत आहे. या छोट्याश्या देशातील हिंसाचार आणि वाद एवढ्या टोकाला गेला आहे की याच देशातून बाहेर असलेले अनेक सेलिब्रिटी देशात परतू इच्छित नाहीत. याच सेलिब्रिटींमध्ये एका नामांकित क्रिकेटपटूचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने आता आपण थेट पाकिस्तानमध्ये भेटू असं बांगलादेश क्रिकेट मंडळाला कळवलं आहे.
ज्या क्रिकेटपटूबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे शाकिब अल हसन! पाकिस्तानमध्ये सुरु होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी देशात येण्यास शाकिब अल हसनने नकार दिला आहे. आपण ढाक्याला येणार नसून पाकिस्तान दौऱ्यासाठी संघाला थेट पाकिस्तानमध्येच भेटू असं शाकिब अल हसनने बोर्डाला कळवलं आहे. बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर शाकिब अल हसन मायदेशी परतणार का यासंदर्भात बरीच चर्चा मागील आठवडाभर सुरु होती.
शेख हसीन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतामध्ये आश्रय घेतल्यानंतर शाकिब अल हसन मायदेशी येण्याची हिंमत करेल का याबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा सुरु होती. शाकिब अल हसन हा शेख हसीना यांच्या अवामी लीगचा खासदार आहे. याच वर्षी जानेवारीत झालेल्या निवडणुकीमध्ये विजय मिळवून तो खासदार झाला होता. शेख हसीना पायउतार होऊन देशातून पळून गेल्यानंतर आता त्यांच्या पक्षाचे नेते जीव मुठीत धरुन जगत आहेत किंवा देश सोडून पळून जात असतानाच शाकिब अल हसनने मायदेशात पाऊल ठेवण्याची हिंमत केलेली नाही. तो देशामध्ये हा राजकीय वाद सुरु अशताना कॅनडामध्ये ग्लोबल 20-20 2024 ही स्पर्धा खेळत होता.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना शाकिब अल हसनने आपण थेट पाकिस्तानात संघाला भेटू असं सांगताना हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. मागील आठवड्यांमध्येच बोर्ड शाकिब अल हसनबरोबर पाकिस्तान दौऱ्यासंदर्भात चर्चा करेल असं सांगण्यात आलं होतं. शाकिब अल हसनला बोर्डाने दिलेल्या ना हरकत पत्राची मुदत 12 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज संपत आहे. तो 13 ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये परतणं अपेक्षित होतं.