VIDEO: जिंकता जिंकता असा हरला नेपाळचा संघ? शेवटच्या चेंडूवरील रन आऊट पाहून मन हळहळेल

NEP vs SA T20 World Cup 2024 Upset: या सामन्यात ओटनील बार्टमनच्या शेवटच्या बॉलवर एक रन घेत नेपाळला सामना टाय करता आला असता. ज्यामुळे सुपर ओव्हर खेळवता आली असती. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 15, 2024, 12:13 PM IST
VIDEO: जिंकता जिंकता असा हरला नेपाळचा संघ? शेवटच्या चेंडूवरील रन आऊट पाहून मन हळहळेल title=

NEP vs SA T20 World Cup 2024 Upset: टी-20 वर्ल्डकपमध्ये एक मोठा उटलफेर होता होता राहिला. शनिवारी नेपाळ विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात अवघ्या एका रनने नेपाळचा पराभव झाला. या सामन्यात एका रनने नेपाळ इतिहास रचता रचता राहिली. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात नेपाळला यश आलं असतं. नेपाळला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 8 रन्सची गरज होती. पहिल्या 4 बॉल्समध्ये टीमने 6 रन्स केल्या होत्या, मात्र शेवटच्या दोन बॉल्सवर नेपाळला दोन रन्स करता आले नाहीत.

या सामन्यात ओटनील बार्टमनच्या शेवटच्या बॉलवर एक रन घेत नेपाळला सामना टाय करता आला असता. ज्यामुळे सुपर ओव्हर खेळवता आली असती. परंतु यावेळी गुलशन झाच्या रन आऊटमुळे नेपाळचा पराभव झाला आणि चाहत्यांची मनं दुखावली गेली.

शेवटच्या बॉलवर काय झाला ड्रामा

ओटनील बार्टमनच्या शेवटच्या बॉलवर गुलशन झाला अपर-कट खेळायचा होता. मात्र तो बॉल चुकला. बॉल थेट विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या ग्लोव्हजमध्ये गेला. यावेळी नेपाळच्या फलंदाजांनी एक रन काढण्याचा निर्णय घेतला. डी कॉकने नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने सरळ थ्रो टाकला. तिथे उपस्थित असलेल्या क्लासेनने बॉल पकडला आणि झा याला नॉन-स्ट्राइकिंग एंडला रनआऊट करून सामना 1 रनने जिंकला.

दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रीझा हेंड्रिक्सच्या 43 रन्सच्या खेळीच्या जोरावर 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावून 115 रन्स केले. हेंड्रिक्सनंतर ट्रिस्टन स्टब्सने 18 बॉल्समध्ये 27 रन्सची खेळी खेळली. नेपाळकडून गोलंदाजीत कुशल भुरटेलने चांगली कामगिरी करत 4 बळी घेतले. तर दीपेंद्र सिंगला तीन यश मिळाले.

116 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळच्या टीमला कुशल भुर्तेल (13) आणि आसिफ शेख (42) यांनी चांगली सुरुवात करून दिली. यांनी पहिल्या विकेटसाठी 35 रन्स केले. मात्र गोलंदाज शम्सीने दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर अनिल शहाने 27 रन्सची खेळी करत नेपाळला विजयाच्या जवळ आणलं. नेपाळला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 8 रन्सची गरज होती. गुलशन झा याने ओटिनिल बार्टमनच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर 2 रन करत नेपाळला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. मात्र शेवटच्या दोन चेंडूंवर त्याला दोन धावा करता आल्या नाहीत. झा शेवटच्या बॉलवर धावबाद झाला आणि नेपाळला अवघ्या 1 रनने पराभवाचा सामना करावा लागला.