US Open 2022: क्रीडा जगातील कोणत्याही खेळाचा सामना हा प्रेक्षकांशिवाय अर्धवट आहे असं म्हणावं लागेल. कोविड संसर्ग काळात स्टेडियम रिकामी असल्याने याचा अनुभव खेळाडूंनी घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांशिवाय सामना खेळणं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं अशी भावना अनेक खेळाडूंनी बोलून दाखवली आहे. मात्र अमेरिकेतील टेनिस स्पर्धेत खेळाडूला वेगळाच अनुभव आला. इतकंच काय तर अस्वस्थ वाटू लागल्याने तक्रार देखील करावी लागली. अमेरिकेत टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा युएस ओपन 2022 सुरु आहे. या सामन्यादरम्याने एक प्रेक्षक गांजा फुंकत असल्याचं समोर आलं आहे. इतकंच काय त्या वासामुळे खेळाडूसह इतर प्रेक्षकही हैराण झाले होते. या प्रकाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निक किर्गिओस आणि फ्रान्सचा बेंजामिन बोन्झी यांच्यात सामना रंगला होता. निकने पहिली फेरी 7-6 अशा फरकाने जिंकली होती. यानंतर दुसऱ्या फेरीचा खेळ खेळला जात होता. दरम्यान, प्रेक्षकांच्या मध्यभागी बसलेला एक व्यक्ती गांजा ओढत असल्याची तक्रार किर्गिओसने चेअर अंपायरकडे केली. गांजाचा धूर मला खूप त्रास देत आहे, असं त्याने पंचांना सांगितलं. तसेच मला जड दम्याचा त्रास आहे, असंही सांगितलं.
Nick Kyrgios just complained to the chair umpire at @usopen that he smelled marijuana coming from the crowd pic.twitter.com/eYDQXOb2rq
— DannyDanko (@DannyDanko) August 31, 2022
हा सामना निक किर्गिओसने जिंकला. त्याने बोन्झीचा 7-6 (7-3) 6-4, 4-6, 6-4 असा पराभव केला. सामन्यानंतर किर्गिओस सांगितलं की, 'लोकांना माहित नाही की मला गंभीर दमा आहे. जेव्हा मी सतत धावतो तेव्हा मला श्वास घेण्यास त्रास होतो.; किर्गिओसच्या तक्रारीनंतर, पंचांनी प्रेक्षकांना ताकीद दिली आणि कोर्टाभोवती धुम्रपान टाळण्यास सांगितले.