मुंबई : टीम इंडियाचा कोच होण्यासाठी दहा जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा, लालचंद राजपूत, फिल सिमंस, टॉम मुडी, डोडा गणेश, रिचर्ड पायबस आणि उपेंद्रनाथ ब्रम्हचारी यांचा समावेश आहे. यातले लालचंद राजपूत सध्या अफगाणिस्तान टीमचे तर राकेश शर्मा ओमान टीमचे कोच आहेत. उपेंद्रनाथ ब्रम्हचारी हे इंजिनिअर असून त्यांना क्रिकेटचा किंवा कोच पदाचा कोणताही अनुभव नाही.
या दहा जणांमध्ये सध्या रवी शास्त्रीचं नाव टीम इंडियाचा नवा कोच म्हणून आघाडीवर आहे. या दहा जणांपैकी शास्त्री, सेहवाग, मूडी, सिमंस, पायबस आणि लालचंद राजपूत या सहा जणांची मुलाखत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उरलेल्या चार जणांची कोच म्हणून वर्णी लागणं अशक्य असल्यामुळे त्यांच्या मुलाखती होणार नसल्याचं बोललं जात आहे.
10 जुलै रोजी दुपारी १ वाजता प्रशिक्षकपदासाठी मुलाखत सुरु होणार आहे. कोचपदांसाठी मुलाखत क्रिकेट अॅडव्हायझर काऊन्सिल घेणार आहे. या काऊन्सिलचे सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली हे सदस्य आहेत.