'भारताच्या वर्ल्ड कप टीममध्ये या खेळाडूची कमी'- सौरव गांगुली

आयपीएल संपल्यानंतर आता भारताच्या क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत.

Updated: May 14, 2019, 06:08 PM IST
'भारताच्या वर्ल्ड कप टीममध्ये या खेळाडूची कमी'- सौरव गांगुली title=

कोलकाता : आयपीएल संपल्यानंतर आता भारताच्या क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण भारतीय टीमला वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंतची कमी जाणवेल, असं वक्तव्य सौरव गांगुलीने केलं आहे. ऋषभ पंतला टीममध्ये न घेण्याच्या निर्णयावर गांगुलीने प्रश्न उपस्थित केले आहेत.

आयपीएलच्या १२व्या मोसमात दिल्लीकडून खेळताना ऋषभ पंतने शानदार कामगिरी केली. पंतच्या या कामगिरीमुळे दिल्लीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यंदाच्या मोसमात सौरव गांगुली हा दिल्लीच्या टीमचा सल्लागार होता.

दुखापतग्रस्त केदार जाधवऐवजी ऋषभ पंतची टीममध्ये निवड करावी का? असा प्रश्न सौरव गांगुलीला विचारण्यात आला. तेव्हा 'तुम्ही असं करू शकत नाही. केदार जाधव लवकर फिट होण्याची मला अपेक्षा आहे. पण तरीही भारताला पंतची कमी जाणवेल', असं उत्तर गांगुलीने दिलं.

गांगुलीकडून रोहितचं कौतुक

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा पराभव करत पुन्हा एकदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यामुळे मुंबईने सर्वाधिक ४ आयपीएल जिंकण्याचा विक्रम केला आहे. मुंबईने या सगळ्या आयपीएल रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकल्या, त्यामुळे रोहितही सर्वाधिक आयपीएल जिंकणारा कर्णधार बनला आहे. रोहितच्या या कामगिरीबद्दल गांगुलीने त्याचं कौतुक केलं आहे. 

दिल्लीच्या यंदाच्या आयपीएलमधल्या प्रवासावरही गांगुलीने भाष्य केलं. या मोसमात आम्ही चांगली कामगिरी केली, पण आम्हाला फायनल गाठता आली नाही, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.