विंडिजविरुद्धचा दुसरा सामना आज, भारताला सीरिज जिंकण्याची संधी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना आज तिरुवनंतपूरममध्ये होणार आहे.

Updated: Dec 8, 2019, 09:43 AM IST
विंडिजविरुद्धचा दुसरा सामना आज, भारताला सीरिज जिंकण्याची संधी title=

तिरुवनंतपूरम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना आज तिरुवनंतपूरममध्ये होणार आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून सीरिज खिशात टाकण्याची संधी भारताला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा विजय झाला होता. हैदराबादमध्ये झालेल्या या मॅचमध्ये विराटच्या नाबाद ९४ रनच्या वादळी खेळीमुळे भारताने २०८ रनचं आव्हान सहज पूर्ण केलं होतं. आव्हानाचा पाठलाग करतानाचा भारताचा हा सगळ्यात मोठा विजय होता.

हैदराबादमध्ये विराटशिवाय केएल राहुलनेही विजयात मोठी भूमिका निभावली होती. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये १०० रनची पार्टनरशीप झाली. केएल राहुल ६२ रन करून आऊट झाला. पहिल्या टी-२०मध्ये भारताची बॅटिंग चांगली झाली असली तरी बॉलिंग आणि फिल्डिंगने मात्र निराशा केली. भारताच्या फिल्डरनी बरेच कॅच सोडल्यामुळे वेस्ट इंडिजला २०७ रनपर्यंत मजल मारता आली.

दुसरीकडे वेस्ट इंडिजला त्यांच्या बॉलिंगची चिंता आहे. बॉलिंगमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मत वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोर्लाडने मांडलं आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या टी-२०मध्ये २३ अतिरिक्त रन दिल्या होत्या.

भारताप्रमाणेच वेस्ट इंडिजची बॅटिंगही मजबूत आहे. पहिल्या मॅचमध्ये शिमरोन हेटमायरने ५६ रन, एव्हीन लुईसने ४० रन आणि पोलार्डने ३७ रन केले होते.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेट कीपर), मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

वेस्ट इंडिजची टीम 

कायरन पोलार्ड (कर्णधार), फेबियन ऍलन, शेल्डन कॉट्रेल, शिमरन हेटमायर, जेसन होल्डर, ब्रेंडन किंग, एव्हीन लुईस, कीमो पॉल, निकोलास पूरन, कारी पीएरे, दिनेस रामदीन, शेरफन रदरफोर्ड, लेंडल सिमन्स, हेडन वॉल्श, किसरिक विलियम्स