हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे. विराट कोहलीच्या ५० बॉलमध्ये नाबाद ९४ रन आणि केएल राहुलच्या ४० बॉलमध्ये ६२ रनमुळे भारताने २०८ रनचं आव्हान ८ बॉल शिल्लक असतानाच पूर्ण केलं. वेस्ट इंडिजने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच रोहित शर्माच्या रुपात धक्का लागला. रोहित १० बॉलमध्ये ८ रन करुन आऊट झाला.
केएल राहुलने मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या ३ ओव्हरमध्येच भारताचा स्कोअर २८ रनपर्यंत पोहोचला. यात राहुलने १६ रन केले. रोहितची विकेट गेल्यानंतर राहुलने पॉवर प्लेमध्ये भारताचा स्कोअर ५०पर्यंत नेला. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये राहुलच्या १ हजार रन पूर्ण झाल्या आहेत. २९ इनिंगमध्येच राहुलने १ हजार रनचा टप्पा गाठला.
राहुल टी-२०मध्ये सगळ्यात जलद १ हजार रन करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानच्या बाबर आजमने २६ इनिंगमध्ये, विराटने २७ इनिंगमध्ये १ हजार रन पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचनेही राहुलप्रमाणेच २९ इनिंगमध्ये १ हजार रन पूर्ण केले.
केएल राहुलने ३२ मॅचच्या २९ इनिंगमध्ये ४३.१७च्या सरासरीने आणि १४५.९२ च्या स्ट्राईक रेटने १,०३६ रन केले आहेत. राहुलने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये १ शतक आणि १६ अर्धशतकं झळकावली आहेत.