मुंबई : टेस्ट क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांची संख्या वाढावी म्हणून आयसीसीने डे-नाईट टेस्ट मॅच खेळवायला सुरुवात केली. पण बीसीसीआयने डे-नाईट टेस्ट मॅच खेळण्यात फारसा रस घेतला नाही. अखेर सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतर भारताचा डे-नाईट टेस्ट मॅचचा विरोध मावळला. अखेर भारत बांगलादेशविरुद्ध पहिली डे-नाईट टेस्ट मॅच खेळला. कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये हा ऐतिहासिक सामना झाला. यानंतर आता भारतीय टीम परदेशातही पहिली डे-नाईट टेस्ट मॅच खेळणार आहे.
यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारत डे-नाईट टेस्ट मॅच खेळणार आहे, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक मोसमात किमान एक डे-नाईट टेस्ट मॅच खेळवली जाते. पण मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारताने डे-नाईट टेस्ट मॅच खेळायला विरोध केला होता. ती टेस्ट सीरिज भारताने २-१ ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याचा विक्रम केला होता.
गाब्बा असो किंवा पर्थ, ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही डे-नाईट टेस्ट मॅच खेळायला तयार आहोत, असं विराट कोहली ऑस्ट्रेलिया मागच्या वर्षी भारत दौऱ्यावर असताना म्हणाला होता. भारतात झालेल्या वनडे सीरिज दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अधिकारी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना भेटले. दोन्ही बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये डे-नाईट टेस्ट मॅचबद्दल चर्चाही झाली.
ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन, पर्थ आणि ऍडलेडच्या मैदानावर डे-नाईट टेस्ट मॅच झाल्या आहेत. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोणत्या मैदानात सामना होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या वर्षाच्या शेवटी भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. नेहमीचा लाल बॉल रात्रीच्या वेळी दिसत नसल्यामुळे डे-नाईट टेस्टसाठी गुलाबी बॉल वापरला जातो.