विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, एकदिवसीय-टी20 क्रिकेटमधून निवृत्त होणार?

Virat Kohli : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून विराट कोहलीने ब्रेक घेतला आहे.

राजीव कासले | Updated: Nov 29, 2023, 04:42 PM IST
विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, एकदिवसीय-टी20 क्रिकेटमधून निवृत्त होणार? title=

Virat Kohli Break to White-ball Cricket: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) एक मोठा निर्णय घेतला आहे. विश्वचषकात विराटने सर्वाधिक 765 धावा केल्या होत्या. बेस्ट प्लेअरचा मानही त्याने पटकावला. पण आता विराट कोहीलने एक निर्णय घेतला असून क्रिकेट चाहतेही संभ्रमात पडले आहेत. विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia T20 Series) पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. 

कोहलीने घेतला मोठा ब्रेक
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा चांगलाच लांबलचक आहे. या दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेने होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि शेवटची  2 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. हा दौरा भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वाचा मानला जातोय. पण या महत्वाच्या दौऱ्यातून विराट कोहलीने माघार घेतली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीने व्हाईट बॉलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती त्याने भारतीय क्रिकेट बोर्डालाही (BCCI) दिल्याचं सांगण्यात आलं आहे. 

विराट कोहली व्हाईट बॉल क्रिकेट खेळणार?
भविष्यात विराट कोहील व्हाईट बॉल क्रिकेट खेळताना दिसणार का? खेळणार की नाही याबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही. व्हाईट बॉल क्रिकेट खेळण्यासाठी कधी उपलब्ध असेन याची माहिती स्वत: देणार असल्याचं विराटने बीसीसीआयला कळवलं आहे. त्यामुळे विराट कोहली व्हाईटबॉलमधून निवृत्त होणार असा अंदाज लढवला जातोय. दुसरीकडे रोहित शर्माही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळणार नसल्याची माहिती आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्माने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त कसोटी क्रिकेट खेळताना दिसतील. 

राहुल की बुमराह कर्णधार कोण?
विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघंही आपापल्या कुटुंबासोह लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतायत. रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला तर एकदिवसीय आणि टी20 मालिकांसाठी विकेटकीपर फलंदाज केएल राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. पण केएल राहुलबरोबरच भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरादेखील कर्णधार पदाचा दावेदार आहे. 

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3 टी0 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 10 डिसेंबरला डरबनला खेळवला जाणार आहे. यानंतर 17 डिसेंबरपासून तीन एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.