मुंबई : टीम इंडियाचे माजी विकेटकीपर विजय यादव (Cricketer Vijay Yadav) सध्या जीवन-मरणाची लढाई लढतायेत. यादव यांची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे. यादव यांनी 19 वनडे आणि 1 कसोटीत टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. सध्या ते पूर्णपणे डायलिसिसवर अवलंबून आहेत. त्यांना बरं होण्यासाठी आता किडनी प्रत्यारोपण करण्याची गरज आहे. भारतीय क्रिकेटर्स असोसिएशन त्याच्या उपचारासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. या माजी भारतीय क्रिकेटपटूला यापूर्वी दोनदा हृदयविकाराचा झटका आला आहे. (team india former cricketer vijay yadav suffers kidney failure)
क्रिकेट व्यतिरिक्त खासगी जीवनात त्यांना फार यश मिळालं नाही. काही वर्षांपूर्वी एक कार अपघात झाला. या कार अपघातात यादव थोडक्यात बचावले. मात्र दुर्देवाने त्यांच्या मुलीचा यात अंत झाला. मुलीच्या जाण्याचं दु:ख पचवून ते पुन्हा मैदानात परतले कोच म्हणून. यादव यांनी फरीदाबाद क्रिकेट अकादमी चालवत आहेत. मोहित शर्मा याच क्रिकेट अकादमीत तयार झाला.
यादव टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासोबत हरियाणासाठी खेळले आहेत. हरियाणाने 1991 मध्ये रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. यादव या विजयी संघाचे सदस्य होते. यादव यांनी 89 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 3 हजार 988 धावा केल्या. यामध्ये 7 शतकं आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.
यादव यांनी 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे डेब्यू केलं. तर 1993 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला. यादव यांनी 1992-94 या 2 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत 19 वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यांनी 118 धावा केल्या.