India squad for England test series: अफगाणिस्तानच्या सिरीजनंतर टीम इंडियाला इंग्लंडसोबत टेस्ट सिरीज खेळायची आहे. 5 सामन्यांची ही टेस्ट सिरीज असून 25 जानेवारीपासून या सिरीजला सुरुवात होणार आहे. अशातच या सिरीजसाठी बीसीसीआयने शुक्रवारी रात्री उशीरा टीम इंडियाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरूद्धच्या सुरुवातीच्या दोन टेस्ट सामन्यांसाठी टीमची घोषणा करण्यात आली असून टीमची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 1-1 अशी टेस्ट सिरीज बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडियाचा सामना इंग्लंडसी होणार आहे. 25 जानेवारी पहिला टेस्ट सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीमच्या कर्णधारपदी रोहित शर्मा असून उप कर्णधारपदाची माळ जसप्रीत बुमराहच्या गळ्यात पडली आहे. याशिवाय टीममध्ये विकेटकीपर म्हणून 22 वर्षीय तरूण खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशकडून खेळणारा 22 वर्षीय विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेलचा पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. केएल राहुल-केएस भरत यांच्यानंतर टीममध्ये तो विकेटकीपर म्हणून तो तिसरा पर्याय असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाच्या फलंदाजांना साजेसा खेळ करता आला नाही. यावेळी चाहत्यांनी तसंच अनेक क्रिकेटच्या दिग्गजांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संधी द्यायला हवी होती असं सल्ला दिला होता. यानंतर इंग्लंडविरूद्धच्या टीममध्ये या दोन खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पुजारा आणि रहाणे या दोघांच्याही नावाचा विचार करण्यात आलेला नाही.
आयपीएलमधून पुढे आलेल्या आवेश खानचा इंग्लंडविरूद्धच्या टेस्ट सामन्यासाठी समावेश केला गेलाय. याशिवाय मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार हे वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत. त्याचप्रमाणे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय कुलदीप यादवचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार) आणि आवेश खान.