'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान

IND vs PAK:  आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) जाहीर आव्हान दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 9, 2024, 01:24 PM IST
'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान title=

IND vs PAK: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. मैदानात 360 डिग्रीमध्ये फटके लगावण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सूर्यकुमार यादवने जागतिक क्रिकेटला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. आपल्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर तो आयसीसी रँकिंगमध्येही वरच्या स्थानी पोहोचला आहे. त्यात आज भारतीय संघ टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानशी भिडणार असून, त्याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमलने सूर्यकुमार यादवला जाहीर आव्हान दिलं आहे. 

'टाइम्स ऑफ इंडियाशी' संवाद साधताना कामरान अकमलने म्हटलं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मोठ्या सामन्यांमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. पाकिस्तानसारख्या प्रचंड दबाव असणाऱ्या मोठ्या सामन्यांद्ये त्यांनी चांगली खेळी केली आहे. पण सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकावर असतानाही पाकिस्तानविरोधात दमदार खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. 

“विराट कोहली अव्वल आहे. दुसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. त्याने अद्याप पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केलेली नाही. पण तरीही मी त्याचीच निवड करेन. रोहित शर्माने आधीच स्वत:ला सिद्ध केलं आहे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने धावा केल्या आहेत आणि आता सूर्यकुमार यादवची पाळी आहे. जर तो नंबर 1 असेल तर त्याने पाकिस्तानविरुद्ध येऊन धावा करायला हव्यात. जेव्हा जेव्हा पाकिस्तानविरोधातील सामन्यात फलंदाजीला उतरला आहे तेव्हा त्याने धावा केल्या नाहीत. मात्र, त्याने इतर संघांविरुद्ध भरपूर धावा केल्या आहेत. तो एक दर्जेदार खेळाडू आणि 360-डिग्रीचा खेळाडू आहे. त्याला फलंदाजी करताना पाहणं ही एक पर्वणीच असते. त्याने फार कमी कालावधीत आपले स्थान पक्कं केलं आहे,” असं कामरान अकमल म्हणाला आहे.

सूर्यकुमार यादव गेल्या 3 वर्षात 4 वेळा पाकिस्तानविरोधातील सामन्यात खेळला आहे. चार सामन्यात तो फक्त 57 धावा करु शकला आहे. एकाही सामन्यात तो 20 पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही. यामधील दोन सामने आशिया कप आणि दोन सामने टी-20 वर्ल्डकपमधील होते. 

रविवारी, सूर्यकुमार यादवला शाहीन आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह यांच्या गोलंदाजीचा सामना करायचा आहे. न्यूयॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान संघ भिडणार आहेत. भारताने आयर्लंडविरुद्ध आरामात विजय मिळवून स्पर्धेला सुरुवात केली आहे, तर पाकिस्तानला सुपर ओव्हरद्वारे यूएसएकडून अपमानास्पद पराभव पत्करावा लागला.