एंटिगा : महिला टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर तुम्हाला हा सामना पाहता येईल. एका वर्षापूर्वीचा ५० ओव्हरच्या वर्ल्ड कप फायनलमधल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय टीमकडे आहे. या मॅचमध्ये विजय झाला तर भारतीय टीम पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचेल. भारताशी तुलना करता इंग्लंडची या वर्ल्ड कपमधली कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. भारतानं त्यांच्या ग्रुप बीमधल्या सगळ्या ४ मॅचमध्ये विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. तर इंग्लंडनं त्यांच्या ग्रुपमधल्या ४पैकी २ मॅच जिंकल्या आणि १ मॅच हरली. इंग्लंडची एक मॅच खेळवण्यात आली नाही.
भारतानं २०१० नंतर पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये पोहोचून वर्ल्ड कप जिंकण्याचे प्रयत्न हरमनप्रीत कौरची टीम करेल. भारतानं एकदाही टी-२० वर्ल्ड कप फायनल खेळलेली नाही. इंग्लंडनं २००९ साली टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. तर २०१२ आणि २०१४ साली ऑस्ट्रेलियानं त्यांना वर्ल्ड कप जिंकण्यापासून रोखलं होतं.
आधीची कामगिरी बघता सेमी फायनल जिंकण्यासाठी भारतीय टीमचं पारडं जड आहे. पण वरच्या क्रमांकावरची बॅटिंग वगळता सगळ्या ४ मॅचमध्ये इतरांना बॅटिंगमध्ये अपयश आलं आहे. मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाशिवाय कोणालाच बॅटिंगमध्ये चमक दाखवता आलेली नाही. जेमिमाह रॉड्रिग्जनं या तिघींशिवाय पहिल्या मॅचमध्ये चांगली खेळी केली होती. सेमी फायनलमध्ये भारताला मधली आणि खालच्या फळीतील बॅटिंग मजबूत करण्याचं आव्हान असेल.
भारताच्या स्पिन बॉलिंगनं या वर्ल्ड कपमध्ये प्रतिस्पर्धी टीमना चांगलाच त्रास दिला आहे. पूनम यादव, राधा यादव, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील या स्पिनरनी या वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या बॉलरच्या भरवशावर भारत टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो.
इंग्लंडची कर्णधार हीथर नाईटची बॅट या वर्ल्ड कपमध्ये शांत आहे. तर टॅमी बेयुमोंटलाही मोठी खेळी करता आलेली नाही. या दोघींनी भारताविरुद्धच्या मॅचमध्ये मोठी खेळी करावी, अशी अपेक्षा इंग्लंडची असेल.
इंग्लंडची ऑल राऊंडर नताली स्क्रायबरनं चांगली फास्ट बॉलिंग केली असली तरी तिची बॅट चालली नाही. तीन प्रमुख खेळाडू बॅटिंग फॉर्ममध्ये नसल्यानंही इंग्लंडच्या चिंता वाढल्या आहेत. बॉलिंगमध्ये अन्या श्रूबसोलनं दोन मॅचमध्ये शानदार कामगिरी केली. तिनं दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ३-३ विकेट घेतल्या. इंग्लंडच्या बॉलिंगची जबाबदारी बेयुमोंटच्या खांद्यावर असेल.
हरमनप्रीत कौर(कर्णधार), स्मृती मंधाना, मिताली राज, जेमिमाह रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया(विकेट कीपर), पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिष्ट, डायलन हेमलता, मानसी जोशी, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी
हीथर नाईट(कर्णधार), टॅमी बायुमोंट, सोफिया डंकले, सोफी एक्केलस्टोन, टेश फरांट, क्रिस्टी गोर्डन, जॅनी गन, डेनियल हेजल, एमी जोन्स, नताली स्क्रायवर, अन्या श्रूबसोल, लिंसे स्मिथ, फ्रान विल्सन, लॉरेन विनफिल्ड, डेनियल वॅट