भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी 250 मिनिटांचा नियम, जाणून घ्या काय आहे?

T20 WC 2024 India vs England, Semi Final 2 : टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने असणार आहेत. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. अशात आयसीसीने 250 मिनिटाचा नियम लागू केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 27, 2024, 05:31 PM IST
भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी 250 मिनिटांचा नियम, जाणून घ्या काय आहे? title=

T20 WC 2024 India vs England, Semi Final 2 : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. आता भारत आणि इंग्लंड दरम्यान सेमीफायनलचा (India vs England Semifinal) दुसरा सामना खेळवला जाणार असून दक्षिण आफ्रिकेबरोबरच ट्रॉफीसाठी कोण भिडणार याचा फैसला होईल. भारत आणि इंग्लंडदरम्यानचा सेमीफायनल सामना गयानात (Guyana) खेळवला जाणार असून या सामन्यावर पावसाचं सावट आहे. गयानात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे सेमीफायनलसाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. पण यासाठी आयसीसीने एक खास नियम बनवला आहे. या नियमामुळे सामना सुरु होण्याची उशीरापर्यंत वाट पाहिला जाऊ शकते.

काय आहे 250 मिनिटांचा नियम?
आयसीसीने भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवलेला नाही. पण यासाठी 250 मिनिटांचा नियम बनवण्यात आलाय. या नियमामुळे सामना निर्धारित वेळेत किंवा त्यानंतर तीन तासांपर्यंत सुरु न झाल्यास 250 मिनिटांचा नियम लागू होईल. म्हणजे पुढच्या 250 मिनिटात (4 तास 10 मिनिटं) सामना संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. भारतीय वेळेनसुरा सामना सुरु होण्याची शेवटची वेळ रात्री 1 वाजून 44 मिनिटं असणार आहे. पण यानंतरही पावसाचा व्यत्यय कायम राहिला तर सामना रद्द केला जाईल. सामना रद्द झाला तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. कारण सुपर-8 ग्रुपमध्ये टीम इंडिया टॉपवर होती.

गयानात वातावरण कसं आहे?
विंडिजमधल्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गयानात 90 टक्के पावसची शक्यता आहे. पण गेल्या 24 तासात गयानातल्या वातावरणात बदल झाला आहे. गेल्या काही तासांपासून तिथे पाऊस पडलेला नाही. सामन्याआधी पाऊस झाला तरी सामना सुर करण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. गयानातलं ड्रेनेज सिस्टम तंत्रज्ञान अद्ययावत आहे. टीम इंडियाने बुधवारी सरावही केला. 

रिझर्व्ह डे का नाही?
भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी रिझर्व्ह डे का ठेवण्यात आला नाही आचं आयसीसीने कारण सांगितलं आहे. संघाला सातत्याने प्रवास करावा लागू नये, संघांच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं आयसीसीने म्हटलं आहे. सेमीफायनलसाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे असंही आयसीसीने सांगितलं.

भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड टीम: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, क्रिस जोर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, फिल साल्ट, रीस टॉपले आणि मार्क वुड.