T20 cricket world cup 2022: आशिया कप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने रसिकांना निराश केलं होतं. भारतीय क्रिकेट संघाचे पुढचे लक्ष्य हे T20 वर्ल्ड कप स्पर्धा असून यासाठी भारतीय संघ सज्ज होत आहे. वर्ल्ड कपसाठीच्या संघात शिखर धवन याला स्थान देण्यात आलेले नाही, यामुळे अतिरिक्त सलामीवीराचा प्रश्न आला तर काय असा प्रश्न विचारला जात होता. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने काही सामन्यांमध्ये विराट कोहली हा देखील सलामीला येऊ शकतो असे म्हटले आहे. याबाबत आपले संघव्यवस्थापनासोबत बोलणे झाले असून के.एल.राहुलऐवजी सलामीवीर म्हणून कोहली हा पर्याय असल्याचे रोहित शर्मा याने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेपूर्वी रोहित शर्मा याने एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये रोहित याला, कोहली याला सलामीला खेळवणार का, असा विचार केला असता त्याने सांगितले की काही सामन्यांमध्ये विराट याला सलामीला खेळवण्यात येईल. आशिया कप स्पर्धेनंतर कोहली याला सलामीला खेळवण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. सुपर 4 सामन्यांमध्ये कोहलीने अफगाणिस्तानविरूद्ध नाबाद 122 धावा केल्या होत्या. त्याचं हे टी20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलं शतक होतं. या शतकानंतर कोहली याला राहुलऐवजी सलामीला खेळवण्यात यावं अशी मागणी व्हायला सुरुवात झाली होती.
एकीकडे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी सज्ज होत असताना दुसरीकडे टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघासाठीची नवी जर्सी सादर करण्यात आली. महिला आणि पुरुष दोन्ही संघांसाठी एकसारखी जर्सी असून यामध्ये निळ्या रंगाच्या गडद आणि फिकट रंगाच्या छटांचा वापर करण्यात आला आहे.