पर्थ : महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताची शानदार कामगिरी सुरुच आहे. पहिले ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर आता भारतीय महिलांनी बांगलादेशला लोळवलं आहे. भारताने ठेवलेल्या १४३ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० ओव्हरमध्ये १२४/८ एवढा स्कोअर करता आला, त्यामुळे भारताचा या मॅचमध्ये १८ रननी विजय झाला.
भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डीला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. राजेश्वरी गायकवाडला १ विकेट घेण्यात यश आलं. बांगलादेशकडून निगार सुलतानाने सर्वाधिक ३५ रनची खेळी केली.
या मॅचमध्ये बांगलादेशने टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला बोलावलं. भारतीय महिलांनी २० ओव्हरमध्ये १४२/६ एवढा स्कोअर केला. शेफाली वर्माने १७ बॉलमध्ये ३९ रनची फटकेबाज खेळी केली. तर जेमीमाह रॉड्रिक्सने ३७ बॉलमध्ये ३४ रन करुन भारताच्या इनिंगला आकार दिला. शेफाली आणि जेमीमाह वगळता कोणत्याच भारतीय खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेशच्या सलमा खातून आणि पन्ना घोषला प्रत्येकी २-२ विकेट घेता आल्या.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये १३२ रनचं आव्हान वाचवलं आणि आता बांगलादेशविरुद्ध १४३ रनचं आव्हान वाचवण्यातही भारतीय बॉलरना यश आलं आहे. २ मॅचमध्ये २ विजयांसह भारतीय टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताच्या मॅच आता न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध होणार आहेत.