प्ले-ऑफच्या आशा मावळल्यानंतरही सुर्यकुमार यादव म्हणतोय, आम्ही चॅम्पियन...!

प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना सुर्यकुमार यादवने मोठं वक्तव्य केलं आहे. 

Updated: Apr 19, 2022, 11:05 AM IST
प्ले-ऑफच्या आशा मावळल्यानंतरही सुर्यकुमार यादव म्हणतोय, आम्ही चॅम्पियन...! title=

मुंबई : आयपीएलचा 15 वा सिझन मुंबई इंडियन्ससाठी चांगला राहिलेला नाही. या सिझनमध्ये मुंबईला अजून एकाही विजयाची नोंद करता आली नाही.  सलग 6 सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावरून मुंबईच्या टीमवर टीका करण्यात येतेय. दरम्यान सुर्यकुमार यादवचा टीममध्ये समावेश झाल्यानंतरही टीमची अवस्था जैसे थे अशीच आहे. तर अखेर यावर आता सुर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना सुर्यकुमार यादवने मोठं वक्तव्य केलं आहे. सुर्यकुमार म्हणाला, मुंबई इंडियन्स एक चॅम्पियन टीम आहे आणि कायम ती एक चॅम्पियन टीम राहील. सध्या फक्त काही सामन्यांची गोष्ट आहे. टीममध्ये आताच काही खेळाडू नवीन असून ते चांगली कामगिरी करतायत.

मुंबईच्या टीममध्ये बॅटींग पोझिशन बदललेली दिसून नाही. यामध्ये सुर्यकुमार यादवचाही फलंदाजीचा क्रम बदलण्यात आला. यावर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, "मी जे करतोय ते मला आवडतंय आणि ते सामन्यांमध्येही दिसून येतंय. जेव्हा तुम्ही मुंबई इंडियन्सकडून खेळता तेव्हा तुमच्यामध्ये सेल्फ मोटिवेशन येतं. यासाठी मला वेगळं काही करण्याची गरज नाही."

माझ्या फलंदाजीच्या क्रमवारीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार टीम मॅनेजमेंटला आहे. मी तीन, चार, पाच किंवा सहा, कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे. माझ्यासाठी ते सामन्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असंही त्याने म्हटलंय.

दरम्यान 6 खेळलेल्या सामन्यांपैकी सर्वांमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमला पराभव स्विकारावा लागला आहे. यामुळे मुंबईच्या प्ले-ऑफच्या आशा मावळल्या आहेत.