मुंबई : सध्या टी-20 मध्ये स्टार फलंदाज म्हणून Suryakumar Yadav चं नाव घेतलं जातं. नुकतंच त्याने दोन दिवसांसाठी का होईना पण टी20 क्रिकेटमधलं सर्वोत्तम स्थान गाठलं होतं. मात्र पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने त्याला मात देत पहिला क्रमांक पटकावला. आता सर्वांना सूर्यकुमारकडून आशा आहेत त्या टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये. अशातच सूर्यकुमारचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई इंडिनयन्सच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडीयो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवचं एक जुनं विधान देण्यात आलंय.
यामध्ये सूर्यकुमार यादवच्या म्हणण्यानुसार, "2020 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मला सिलेक्ट केलं नाही, तेव्हा मी पूर्णपणे कोलमडलो होतो. मी निराश देखील झालो होतो. मात्र कठीण प्रवासानंतर ती वेळ अखेर आलीच."
या व्हिडीयोमध्ये नंतर सूर्याकुमार यंदाच्या वर्ल्डकपची कशी तयारी करतोय हे दाखवलंय. यामध्ये त्याची पत्नी त्याला काळा कोट घालण्यास मदत करत असून सूर्यकुमार ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यासाठी बॅग घेऊन तयार असल्याचं दिसतंय.
सूर्यकुमार यादवने 2022 या वर्षात आपला झंझावात कायम राखला आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत अव्वल स्थान मिळवण्याची संधी सूर्यकुमार यादवकडे आहे. पण त्याला पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची कडवी झुंज आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील सात सामन्यात रिझवानने 316 धावा केल्या.