मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका आयोजित करण्यात आली होती. भारतीय टीमने ही मालिका जिंकली, मात्र तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीमला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं.
या सामन्यात टीमची गोलंदाजी किंवा फलंदाजी दोन्ही वाईट झाल्याचं दिसून आलं. या पराभवानंतरही रोहितमध्ये आत्मविश्वास होता. यावेळी बुमराहच्या बदलीबाबतही मोठा खुलासा केला. शिवाय टीमचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवबाबतंही मोठा खुलासा केलाय.
रोहित शर्माने सामना संपल्यानंतर सांगितलं की, टीमला आगामी T20 वर्ल्डकपसाठी सज्ज होण्याची गरज आहे. खेळाडूंना त्यांची कामगिरी सुधारावी लागेल.
रोहित म्हणाला, “अनेक गोष्टींवर आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. सूर्यकुमारचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. गोलंदाजी ही आमची समस्या आहे, आम्हाला त्यावर काम करावं लागेल. आम्ही कमबॅक करू आणि अशा कठीण टीमविरुद्ध आम्ही काय चांगले करू शकतो त्यावर लक्ष देऊ. शिवाय आम्ही कठीण प्रश्नांची उत्तरे शोधत राहू."
तो पुढे म्हणाला, "एक टीम म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतो की, निकाल काहीही असो, सुधारणा झाली पाहिजे. पॉवरप्ले, मिडल ओव्हर्स आणि डेथ ओव्हर्समध्ये आणखी कोणते पर्याय मिळू शकतात हे पाहण्यासाठी आम्हाला आमच्या गोलंदाजीकडे लक्ष द्यावं लागेल."
दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 228 धावाचं आव्हान ठेवलं होतं. 228 धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पत्त्यासाठी ढासाळली. रोहित शर्माला भोपळा फोडता आला नाही. दिनेश कार्तिकने सर्वाधिक 46 धावा केल्या. मात्र, इतर कोणत्याही खेळाडूला मोठी कामगिरी करता आली नाही. दीपक चहरने अखेरीस फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 17 बॉलमध्ये 31 धावा केल्या. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.