IPL 2019: सुरेश रैनाचा विक्रम ! हे रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू

कोलकाता विरुद्ध रैनाने नॉटआऊट ५८ रनची खेळी केली होती.     

Updated: Apr 15, 2019, 01:31 PM IST
 IPL 2019: सुरेश रैनाचा विक्रम ! हे रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू title=

कोलकाता : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ५ विकेटने विजय झाला. या मॅचमध्ये चेन्नईकडून सर्वाधिक सुरेश रैनाने नाबाद ५८ रन केल्या. कोलकात्याने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचे पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. पण रैनाने निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळी करुन विजय मिळवून देण्यास मोठा हातभार लावला. रैनाचे हे अर्धशतक आयपीएल मधील ३४ वे अर्धशतक ठरले आहे. रैनाने केलेल्या ५८ रनच्या खेळीसोबतच रैनानं नवा विक्रम केला आहे. हा विक्रम करणारा रैना हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

आयपीएलमध्या दोन टीम विरुद्ध ८०० रन करण्याचा रेकॉर्ड रैनाने केला आहे. याआधी रैनाने ८०० पेक्षा जास्त रन करण्याची कामगिरी मुंबई विरुद्ध केली होती. त्यामुळे दोन टीम विरुद्ध प्रत्येकी ८०० पेक्षा अधिक रन करण्याचा मान रैनाने मिळवला आहे. 

रैनाने याआधी मुंबईविरुद्ध एकूण ८०३ रन केल्या आहेत. तर कोलकात्याविरुद्ध त्याने आतापर्यंत ८१८ रन काढल्या आहेत. तसंच रैनाने पंजाबविरुद्ध आतापर्यंत  ७६१ रन केल्या आहेत. रैना पंजाबविरुद्ध ८०० रन करण्यापासून केवळ ३९ रन दूर आहे. रैनाने ३९ रन केल्यानंतर तो तीन टीम विरुद्ध प्रत्येकी ८०० रन करण्याचा मान मिळवेल. सध्या तरी या रेकॉर्डच्या बाबतीत रैनाच्या जवळपास देखील कोणीही नाही.

रैनासारखी अशी कामगिरी स्फोटक क्रिस गेल आणि विराट कोहलीला देखील करता आलेली नाही. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीविरुद्ध ८०२ रन केल्या आहेत. पण आतापर्यंत दोन टीम विरुद्ध ८०० रनचा टप्पा कोहलीला पार करता आलेला नाही.

तर ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी एका टीम विरुद्ध ७०० पेक्षा अधिक रन करण्याची कामगिरी केली आहे. ख्रिस गेलने पंजाबविरुद्ध ७९७ रन केल्या आहेत, तर डेव्हिड वॉर्नरने कोलकात्याविरुद्ध ७६२ रन कुटल्या आहेत.