भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आणि सध्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) समालोचन करणारा सुरेश रैना याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश रैनाच्या (Suresh Raina) मामेभावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. सुरेश रैनाच्या भावाला धडक दिल्यानंतर टॅक्सीचालक फरार झाला आहे. नंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथे ही घटना घडली आहे.
एसपी कांगडा शालिनी अग्निहोत्री यांनी सांगितलं की, सुरुवातीला गगल पोलीस ठाण्याअंतर्गत हिट अँड रनचं प्रकरण झाल्याचं समोर आलं होतं. या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फरार टॅक्सीचालकाचा पाठलाग करत त्याला मंडी येथून ताब्यात घेतलं.
एसपी कांगडा शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जवळपास 11.30 च्या सुमारास गगलमध्ये हिमाचल टिम्बरजवळ एका अज्ञात वाहनचालकाने वेगाने स्कूटीला धडक दिली. यानंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. या दुर्घटनेत स्कूटीचालक सौरभ कुमार आणि शुभम यांचा मृत्यू झाला. सौरभ हा सुरेश रैनाचा मामेभाऊ आहे.
सौरभ आणि शुभम यांना धडक दिल्यानंतर आरोपी टॅक्सीचालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास वाहनाचा शोध घेतला. यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे टॅक्सीचा पाठलाग करत आरोपी चालकाला पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कांगडा येथे आणलं. त्याची चौकशी सुरु असून, पुढील कारवाई केली जात आहे.
सुरेश रैनाच्या काकांचं कुटुंब 2020 मध्ये ठार कऱण्यात आलं होतं. सुरेश रैनाने 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला होता. "माझ्या कुटुंबात शोककळा पसरली होती. माझ्या काकाच्या कुटुंबात मृत्यू झाले होते. कच्छे गुंडांच्या एका गटाने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली होती. पठाणकोटमध्ये हे घडले होते. म्हणून मी तिथे गेलो. पण आयपीएलमध्ये बायो-बबल होता, ज्यामुळे तुम्ही परतू शकत नव्हता. माझं कुटुंब फार तणावात होतं. मी विचार केला की, क्रिकेट ही प्राथमिकता नसून ते नंतरही खेळू शकतो. त्यावेळी कुटुंब महत्त्वाचं होतं," असं सुरेश रैनाने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
सुरेश रैना पहिल्या हंगामापासून चेन्नई संघाचा भाग राहिला आहे. चेन्नईच्या यशात त्याचाही वाटा आहे. सुरेश रैना खेळत असताना चेन्नई संघ नऊ वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला होता. यामधील 4 वेळा त्यांनी स्पर्धा जिंकली. रैनाने सीएसकेसाठी 200 सामने खेळले. आजही 200 सामन्यांमध्ये 39.40 च्या सरासरीने 5529 धावा करून तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.