मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाच्या वर्षीची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. एवढच नाही तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवरही संकट ओढावलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत टी-२० वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी आयपीएल आणि वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत त्यांचं मत मांडलं आहे.
'ऑस्ट्रेलियामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत परदेशी नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. टी-२० वर्ल्ड कप ऑक्टोबरमध्ये होणार असेल, तर अशा परिस्थितीत याचं आयोजन कठीण दिसत आहे. २०२१ सालचा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. जर भारत आणि ऑस्ट्रेलियाने ठरवलं आणि भारतातली कोरोनाग्रस्तांची संख्या घटली तर स्पर्धांची अदलाबदली होऊ शकते. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-२० वर्ल्ड कप होऊ शकतो. तसंच पुढच्यावर्षी भारतात होणारा टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात खेळवला जाऊ शकतो,' असं गावसकर म्हणाले.
'टी-२० वर्ल्ड कपचं आयोजन भारतात झालं, तर सप्टेंबर महिन्यात आयपीएलही खेळवता येईल. टी-२० वर्ल्ड कपच्या आधी आयपीएलचं आयोजन केलं, तर खेळाडूंनाही सराव होईल. आयपीएलनंतर नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्ड कप आणि डिसेंबर महिन्यात आशिया कपचं आयोजन करता येईल. डिसेंबर युएईमध्ये स्पर्धा भरवण्यासाठी योग्य वेळ आहे,' असं गावसकर यांनी सांगितलं.