भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट मंडळाचे सचीव जय शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जय शाह यांनी भारतीय क्रिकेटसाठी भरीव कामगिरी केल्याचं गावसकरांनी म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी चांगलं काम केल्यानंतरही केवळ राजकीय अजेंड्यापोटी त्यांच्यावर काहीजण टीका करुन त्यांना हवं तेवढं श्रेय देत नाहीत, असं गावसकर म्हणाले. त्याचप्रमाणे अनेकदा अनेकदा जय शाह यांना क्रिकेटमधील ज्ञान नसतानाही त्यांच्याकडे एवढी मोठी जबाबदारी सोपवण्यावरुन टीका होते. या टीकेवरुनही गावसकर यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. क्रिकेट खेळणाऱ्यांनीच बीसीसीआयच्या पदावर असावं असं आपल्याला वाटत नाही. उलट जे क्रिकेट खेळले नाहीत ते अधिक उत्तमप्रकारे कारभार हाताळू शकतात असं आपल्याला वाटत असल्याचं म्हणत गावसकर यांनी जय शाह यांची पाठराखण केली आहे.
बीसीसीआयचा दैनंदिन कारभार चालवण्यासाठी कायम माजी क्रिकेटपटूंनाच संधी दिली पाहिजे असं गरजेचं नसल्याचं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे. बीसीसीआयचा कारभार चालवणं हे तज्ज्ञांचं काम असल्याचं आपल्याला वाटतं, असं गावसकर म्हणाले. "माझ्या अनुभवावरुन मी असं सांगू शकतो की ज्यांना क्रिकेट अधिक आवडतं ते क्रिकेट खेळलेल्यांपेक्षा भारतीय क्रिकेटसाठी अधिक योगदान देतात. हे तुम्हाला आश्चर्यचकित करणारं विधान वाटू शकतं. मात्र जे लोक या खेळाबद्दल फार पॅशनेट आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास ते क्षेत्रात अधिक भरीव योगदान देताना दिसतात. यासाठी त्यांनी हा खेळ खेळलाच पाहिजे असं काही बंधनकारक नसतं. काही माजी क्रिकेटपटू हे त्यांच्याच काळात रमलेले असतात. त्यामुळे ते शध्याच्या पिढीला फायदा होईल असे निर्णय घेण्यास विरोध दर्शवण्याची शक्यता नाकारता येत नाही," असं स्पष्ट मत सुनील गावसकर यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना व्यक्त केलं.
नक्की वाचा >> 'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली
"त्यामुळेच माझं असं मत आहे की माजी क्रिकेटपटू हे क्रिकेटमधील तांत्रिक गोष्टी शोधण्यासाठी, त्यावर भाष्य करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजेच खेळाचे नियम, रणजी चषकामधील स्पर्धात्मकता वाढवणे यावर माजी क्रिकेटपटू भाष्य करु शकतात. मात्र दैनंदिन कारभार पाहणे, आर्थिक नियोजन करणे यासारख्या गोष्टींची जबाबदारी तज्ज्ञांकडे सोपवली पाहिजे," असं गावसकर म्हणाले.
नक्की वाचा >> 'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'
दरम्यान, केवळ जय शाहाच नाही तर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी यापूर्वी बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषवलं आहे. याशिवाय सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले आशिष शेलार हे सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिशएनशी संलग्न पदाधिकारी आहेत.