माले : भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय फुटबॉल संघाने नेपाळचा 3-0 असा पराभव केला आहे. या विजयासोबतच भारताने 8व्या वेळी सैफ चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं. इतकंच नाही तर कर्णधार सुनील छेत्रीने 49 व्या मिनिटाला गोल करून लिओनेल मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय गोल्सची बरोबरी केली.
भारतासाठी सेकंड हाफमध्ये सुनील छेत्री, सुरेश सिंग आणि सहल अब्दुल समद यांनी गोल केले. सुरेशने 50 व्या आणि समदने 90 व्या मिनिटाला गोल केला. या तिघांच्या गोलमुळे भारताने 3-0 अशी आघाडी घेत विजय मिळवला.
मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमक यांच्यासोबत भारताचं हे पहिलं विजेतेपद आहे. जिरी पेसेक (1993) आणि स्टीफन कॉन्स्टँटाईन (2015) यांच्यानंतर ते तिसरे परदेशी प्रशिक्षक बनलेत. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं आहे.
या सामन्यामध्ये 49व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या गोल्सशी बरोबरी आहे. मेस्सी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 80 गोल आहेत. तर छेत्रीने देखील कालच्या सामन्यात गोल नोंदवत मेस्सीच्या गोल्सशी बरोबरी केली आहे.
सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नावावर आहे. त्याच्या नावे एकूण 115 गोल्सची नोंद आहे. तर आता या यादीत मेस्सी आणि छेत्री संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांचे समान 80-80 आंतरराष्ट्रीय गोल आहेत.