CSK कडून खेळणार रोहित शर्मा? MI ने कॅप्टन म्हणून काढल्यानंतर यल्लो जर्सीतील फोटो समोर

Rohit Sharma No Longer Mumbai Indians Captain:  चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्र सिंग धोनी वगळता रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आपल्या संघाला 5 वेळा चषक जिंकून दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 18, 2023, 08:49 AM IST
CSK कडून खेळणार रोहित शर्मा? MI ने कॅप्टन म्हणून काढल्यानंतर यल्लो जर्सीतील फोटो समोर title=
सोशल मीडियावर हा फोटो झाला व्हायरल

Rohit Sharma No Longer Mumbai Indians Captain: इंडियन प्रिमिअर लिगमध्ये एकूण 11 पर्वांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मा यंदाच्या म्हणजेच 2024 च्या पर्वात संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. इंडियन प्रिमिअर लिगच्या आगामी पर्वामध्ये हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा शुक्रवारी करण्यात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. 5 वेळा आयपीएलच्या चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्व अचानक बदलण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्र सिंग धोनी वगळता रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आपल्या संघाला 5 वेळा चषक जिंकून दिला आहे. काही आठवड्यांपूर्वीच गुजरात टायटन्सच्या संघातून स्वगृही परतलेल्या हार्दिक पंड्यावर आता मुंबईच्या संघाने नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

हार्दिकची कमाल कामगिरी

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली 2022 च्या आपल्या पहिल्याच पर्वात गुजरात टायटन्सने थेट जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतरच्या पर्वात म्हणजेच 2023 साली गुजरातचा संघ उपविजेता ठरला होता. चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरातला धूळ चारलेली. मात्र गुजरातचं नेतृत्व करताना हार्दिक पंड्याची कामगिरी खरोखरच लक्षवेधी ठरली. म्हणूनच की काय रोहितसारख्या अनुभवी व्यक्तीला बाजूला सारुन संघाची धुरा हार्दिकच्या खांद्यावर सोपवण्यात आली. याचदरम्यान आता रोहित शर्मा इतर कोणत्या संघाकडे जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. अशाचत 2 वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य राहिलेला चेन्नई सुपर किंग्जच्या एका खेळाडूने रोहित संदर्भात एक फारच चमत्कारिक शक्यता व्यक्त केली आहे.

ती पोस्ट चर्चेत

चेन्नईचा माजी फलंदाज एस. बद्रीनाथने रोहित शर्माबद्दल एक विचित्र शक्यता व्यक्त केली आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरुन (आधीचं ट्वीटर) बद्रीनाथने रोहित शर्माचा एक मॉर्फ फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीमध्ये दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना बद्रिनाथने "जर असं घडलं तर.." अशा अर्थाची कॅप्शन दिली आहे. 23 हजार जणांनी ही पोस्ट लाइक केली आहे. तर 1700 हून अधिक जणांनी रिट्वीट केली आहे. या पोस्टवर 756 जणांनी कमेंट केली आहे.

सीएसकेचा कर्णधार धोनीच

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचं नेतृत्व आगामी पर्वामध्येही एम. एस. धोनीच करणार आहे. धोनीने नुकत्याच झालेल्या पर्वात चेन्नईला पाचव्यांदा जेतेपद मिळवून दिलेलं.