Out की Not Out? स्टंम्प पडल्यानंतर बेल्स राहिल्या तशाच, क्रिकेटच्या नियमांना नवं आव्हान

ऑस्ट्रेलियातील एका प्रीमियर क्रिकेट स्पर्धेदरम्यान घडलेल्या एका विचित्र घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकेट पडल्यानंतर स्टंम्प खाली पडला मात्र बेल्स तशाच राहिल्याने आऊट की नॉट आऊट अशी चर्चा सुरु झाली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 11, 2023, 02:12 PM IST
Out की Not Out? स्टंम्प पडल्यानंतर बेल्स राहिल्या तशाच, क्रिकेटच्या नियमांना नवं आव्हान title=

Viral News : क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. 2023 या वर्षात तर त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला उशीर केल्यामुळे बाद केले होते. तर दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू मुशफिकुर रहीम याने फलंदाजी करताना हाताने चेंडू अडवला होता. मुशफिकुरने चेंडू स्टंपला लागू नये म्हणून तो हाताने अडवला होता. त्यामुळे त्याला आऊट देण्यात आले. आता असाच एक विचित्र प्रकार एका सामन्यादरम्यान घडला आहे. गोलंदाजाने फलंदाजाला बोल्ड केल्यानंतर मधला स्टंप उडाला मात्र बेल्स खाली पडल्याच नाही. याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अशावेळी आऊट द्यायला हवं की नको अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 

ऑस्ट्रेलियातील एसीटी प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत हा सगळा प्रकार घडला आहे. या घटनेचा जेव्हा फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा सगळेच ते पाहून थक्क झाले. या प्रकारामुळे आयसीसीच्या नियमांसाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कारण अशा परिस्थितीत फलंदाजाला नाबाद दिले तर तो गोलंदाजावर मोठा अन्याय ठरेल. गिनिंडेरा क्रिकेट क्लब आणि वेस्ट डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लब यांच्यात सामना सुरू असताना ही घटना घडली. मात्र बऱ्याच चर्चेनंतर मधला स्टंम्प उडाल्यानंतरही फलंदाजाला नाबाद दिले गेले कारण बेल्स जमिनीवर पडल्याच नाहीत.

नेमकं काय घडलं?

कॅनबेरा टाईम्सच्या वृत्तानुसार, गिनिंडेरा क्लबचा गोलंदाज अँडी रेनॉल्ड्सने सलामीवीर मॅथ्यू बोसुस्टोला बाद केले होते. अँडीच्या चेंडूने मधला स्टंप खाली पाडला. त्याचवेळी अँडी रेनॉल्ड्सने विकेट घेतल्याचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. मॅथ्यूही पॅव्हेलियनच्या दिशेने परतायला लागला. त्यानंतरही काही काळ मैदानावर सगळे विकेटच्या आनंदात होते. मात्र स्टंम्पकडे लक्ष जाताच सगळ्यांना धक्का बसला. कारण बेल्स खाली पडल्याच नव्हत्या. त्यानंतर दोन्ही मैदानी अम्पायरने बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर मॅथ्यूला नाबाद घोषित केले. मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या नियम 29 नुसार, बॅट्समनला क्रिकेटमध्ये तेव्हाच बॉलिंग मानले जाईल जेव्हा बेल्स पूर्णपणे जागेवर असतील किंवा एक किंवा दोन स्टंप जमिनीतून पूर्णपणे खाली पडतील. या प्रकरणात यापैकी असं काहीही झाले नाही.

 

नियम काय सांगतो?

मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या म्हणण्यानुसार, " स्टम्प पडला हे तेव्हाच गृहीत धरले जाते जेव्हा त्याच्यावरील एक किंवा दोन बेल्स जमीनीवर पडतात." हे नियम 29.22 मध्ये स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वेस्ट डिस्ट्रिक्टचा कर्णधार सॅम विटमनने नंतर कबूल केले की संघ या निर्णयावर नाराज आहे. "मी याआधी असे काही पाहिले नाही. हे असं काही घडताना कोणी पाहिले नाही. काही काळ आम्ही सर्वजण विकेटबद्दल आनंदी होतो. मात्र फलंदाज परत मैदानावर आल्याने आम्हाला आनंद झाला नाही. काही वेळाने आम्ही त्याला पुन्हा वाद केले तेव्हा मला आनंद झाला," असे सॅम विटमनने म्हटलं आहे.