Asian Games : चीनने भारताच्या 'या' 3 खेळाडूंवर घातली बंदी, अनुराग ठाकूर यांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Anurag Thakur, Asian Games : चीनच्या खुरापतीनंतर आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनचा दौरा रद्द केला आहे. आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे, असं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत. 

Updated: Sep 22, 2023, 04:40 PM IST
Asian Games : चीनने भारताच्या 'या' 3 खेळाडूंवर घातली बंदी, अनुराग ठाकूर यांनी घेतला धक्कादायक निर्णय! title=
Anurag Thakur, Asian Games

Anurag Thakur cancels China trip : कोणत्या ना कोणत्या खुरापती करणं ही सवय आता चीनच्या अंगवळणी पडल्याचं पहायला मिळतं. गेल्या काही दिवसांपासून अरूणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) मुद्द्यावरून चीनने वारंवार भारताचा डिवचलं दिसून आलंय. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अशातच आता चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये (Asian Games) देखील खोडसाळपणा केलाय. त्यावर भारत सरकारने देखील मोठं पाऊल उचलल्याचं दिसून येतंय.

चीनने भारताच्या तीन वुशू खेळाडूंना देशात येण्याची परवानगी दिली नाही. त्याला कारण अरूणाचल प्रदेश. हे तीनही खेळाडू अरूणाचल प्रदेशचे आहेत. नयेमन वांगसू, ओनिलू तेगा आणि मेपुंग लामगू असं या तीन खेळाडूंचं नाव आहे. हे तिन्ही खेळाडू अरूणाचल प्रदेशचे रहिवासी असल्याने चीनने मुद्दामहून व्हिसा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. चीनच्या खुरापतीनंतर भारतीय खेळाडूंना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वसतिगृहात परत आणण्यात आलं. त्यानंतर क्रीडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.

चीनच्या खुरापतीनंतर आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनचा दौरा रद्द केला आहे. आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे, असं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत. अरूणाचल प्रदेश आमच्या देशाचा भाग होता अन् नेहमी राहिल. रहिवासी किंवा जातीच्या आधारावर आमच्या नागरिकांशी असमान वागणूक भारत ठामपणे नाकारतो. चीनने आशियाई खेळांच्या भावना आणि आचार नियमांचं उल्लंघन केलंय. सदस्य देशातील खेळाडूंशी भेदभाव केला जाऊ शकत नाही. आमच्या खेळाडूंविरोधात जोरदार काउंटर तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

आणखी वाचा - IND vs AUS : शमीने केल्या स्मिथच्या बत्त्या गुल, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा Video

दरम्यान, भारतीय खेळाडूंना चीनमध्ये याआधी देखील व्हिसा देण्यात आला आहे. याआधी चीनने व्हिसा देण्यास नकार दिला नव्हता. यावेळी मात्र, या खेळाडूंना व्हिसा दिला गेला नाही. मला वाटत नाही की ही ओसीएची समस्या आहे कारण चीनने त्यासाठी करार केला आहे. प्रमाणित पात्रता असलेल्या सर्व खेळाडूंना चीनमध्ये खेळायला येऊ द्या. हे स्पष्ट केलेलं आहे. व्हिसा आधीच मंजूर झाला आहे, असं एथिक्स कमेटीचे अध्यक्ष वेई जिज़होंग यांनी म्हटलंय.