6,6,6,6,4,6,6... बापरे! Steve Stolk ची क्रिकेट इतिहासातील वादळी खेळी; लोकांना 'युवराज' आठवला!

Steve Stolk fastest fifty in U19 World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या फलंदाजाने अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावून एक मोठी कामगिरी केली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 27, 2024, 09:37 PM IST
6,6,6,6,4,6,6... बापरे! Steve Stolk ची क्रिकेट इतिहासातील वादळी खेळी; लोकांना 'युवराज' आठवला! title=
Steve Stolk, U19 World Cup

South Africa vs Scotland : दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघाचा सलामीवीर फलंदाज स्टीव्ह स्टोक (Steve Stolk) याने आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये ( U19 World Cup 2024) आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला आहे. स्टीव्ह स्टोकने स्कॉटलंडविरुद्ध अंडर 19 विश्वचषकातील सर्वात जलद अर्धशतक झळकावून खळबळ उडवून दिलीये. स्टीव्ह स्टोकने अवघ्या 13 चेंडूत आपलं अर्धशतक (Steve Stolk fastest fifty) पूर्ण केलं. 17 वर्षांच्या स्टीव्हने डावाच्या पहिल्या तीन षटकांत अर्धशतक पूर्ण केलं होतं. 

स्कॉटलंडने दिलेल्या 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला स्टीव्ह स्टोकने झंझावाती सुरुवात करून दिली. स्टीव्हने स्कॉटिश गोलंदाज कासिम खानकडून एकाच षटकात 5 षटकारांसह सलग 6 चौकार मारून 34 धावा काढण्याचा महान पराक्रमही केला.

स्टीव्ह स्टोकच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने स्कॉटलंडने दिलेले 270 धावांचं आव्हान अवघ्या 27 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या सामन्यात स्टोकने 37 चेंडूंचा सामना करत 86 धावांची शानदार खेळी खेळली. 232 च्या स्ट्राईक रेटने खेळताना स्टोकने 7 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार ठोकले.

दरम्यान, स्कॉटलंडने 50 षटकांत 9 गडी गमावून 269 धावा केल्या होत्या. मात्र, फलंदाजीला पुरक अशा खेळपट्टीवर साऊथ अफ्रिकन धुरंधरांनी धुव्वा उडवला अन् दणक्यात सामना खिशात घातला. 

पाहा Video

दक्षिण आफ्रिका अंडर-19 पूर्ण संघ: डेव्हिड टीगर, जुआन जेम्स, मार्टिन खुमालो, ट्रिस्टन लुस, क्वेना माफाका, दिवान मारियास, रिले नॉर्टन, न्कोबानी मोकोएना, रोमाशन पिल्ले, सिफो पोट्साने, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रिचर्ड सेलेट्सवेन, ऑलिव्हर व्हाइटहेड, स्टीव्ह स्टोल्क आणि एनटांडो झुमा.

स्कॉटलंड अंडर-19 पूर्ण संघ: ओवेन गोल्ड, उझैर अहमद, हॅरी आर्मस्ट्राँग, लोगन ब्रिग्स, जेमी डंक, बहादर एसाखिल, इब्राहिम फैसल, रॉरी ग्रँट, आदि हेगडे, मॅकेन्झी जोन्स, मनू सारस्वत, कासिम खान, निखिल कोटेश्वरन, रुवारी मॅक्टेरी, ॲलेक किन्मत.