BCCI अध्यक्षपद सोडल्यानंतर Sourav Ganguly राजकारणात नवी इनिंग खेळणार?

सौरव गांगुलीने नव्या इनिंगची सुरुवात करणार असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Jun 1, 2022, 06:06 PM IST
BCCI अध्यक्षपद सोडल्यानंतर Sourav Ganguly राजकारणात नवी इनिंग खेळणार?  title=

कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना क्रिकेट क्षेत्रात 30 वर्षे पूर्ण होत आहेत. बुधवारी (1 जून) ट्विट करून माहिती दिली की, ते नवीन इनिंगला सुरुवात करणार आहेत. मात्र, गांगुलीने याबाबत सविस्तर काहीही सांगितले नाही.

गांगुलीने ट्विट केले की, 'मी 1992 मध्ये क्रिकेटर म्हणून माझी इनिंग सुरू केली. त्याला 2022 मध्ये 30 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. मुख्य म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला. या प्रवासाचा भाग असलेल्या, मला पाठिंबा देणाऱ्या आणि आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. आज मी काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत आहे ज्याद्वारे मी मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करू शकेन. मला आशा आहे की माझ्या आयुष्याच्या नवीन अध्यायात तुम्ही मला मदत करत राहाल.

गांगुली आणि अमित शहा यांची भेट

गृहमंत्री अमित शाह यांनी (६ मे) गांगुली यांची भेट घेतली होती. शाह गांगुलीच्या कोलकाता येथील निवासस्थानी डिनरसाठी पोहोचले होते. या दोघांच्या भेटीनंतर गांगुली भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या वर्षीही याबाबत चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर गांगुलीने भाजपमध्ये येण्यास नकार दिला होता.

A day after dinner with Amit Shah, Sourav Ganguly says 'Mamata Banerjee is very...'

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकीर्द

सौरव गांगुलीने 1992 मध्ये ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर 1996 मध्ये लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. गांगुलीचा शेवटचा कसोटी सामना 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात झाला होता. 2007 मध्ये ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. गांगुलीने 113 कसोटीत 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या. त्याचबरोबर 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11363 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 41.02 होती. भारताच्या माजी कर्णधाराने कसोटीत 16 आणि एकदिवसीय सामन्यात 22 शतके झळकावली आहेत.

सौरव गांगुलीची नवीन इनिंग नेमकी काय असणार आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. ते राजकारणात येणार का याबाबत ही शंका आहे. क्रिकेट क्षेत्रातच काही नवीन सुरुवात ते करु शकतात अशी देखील चर्चा आहे.