मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. वेगानं पसरणाऱ्या कोरोनाचं क्रिकेट विश्वावर संकट खूप मोठं आहे. या संकटातही सर्वतोपरी काळजी घेऊन IPL2021 चौदाव्या हंगामासाठी सामने खेळवले जात आहेत. आज दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना आहे. पण त्यापूर्वी आज महत्त्वाचा निर्णय येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा मुद्दा सध्या न्यायप्रवीष्ट आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा सौरव गांगुली राहणार की नाही याबाबत आज अंतिम निर्णय होणार आहे. गुरुवारी सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या व्यवस्थापनाच्या भविष्याबद्दल सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे.
हा निर्णय नेमका काय येणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या निर्णय येईपर्यंत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सरचिटणीस जय शाह आणि जयेश जॉर्ज यांच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे.
हा निर्णय गेल्या काही महिन्यांपासून कोर्टात प्रलंबित आहे. सौरव गांगुली यांच्यासह इतर दोन अधिकारी आपल्या पदावर कायम राहणार की नाही याबाबत अंतिम निर्णय कोर्ट घेणार आहे.
बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार राज्य क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयमध्ये सहा वर्षे हे पद सांभाळल्यानंतर त्या अधिकाऱ्याला पुढे पुन्हा पदावर येण्यासाठी 3 वर्ष कूलिंग पीरियडमधून जावं लागेल. त्याशिवाय पुन्हा अध्यक्षपदावर येता येणार नाही. या नियमांतर्गत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुदत 2020मध्येच संपली होती. मात्र त्यांना 8 महिने वाढवून देण्यात आली होती.
23 मार्च रोजी यासंदर्भात निर्णय येणार होता. मात्र काही कारणांनी तो आला नाही. त्यामुळे यावर आज निर्णय होणार आहे. सौरव गांगुली यांच्या डोक्यावर त्यामुळे टांगती तलवार असणार आहे. हा निर्णय काय येतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.