...म्हणून कर्णधारपदी रोहित शर्माचं बेस्ट!

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित शर्मा हा कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Dec 17, 2021, 11:26 AM IST
...म्हणून कर्णधारपदी रोहित शर्माचं बेस्ट! title=

मुंबई : अनुभवी सलामीवीर रोहित शर्माची वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पुढील कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर क्रिकेट जगतातून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कर्णधार बदलाची घोषणा अचानक करण्यात आली. मात्र, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या निर्णयाचे समर्थन केलं असून रोहित शर्मा हा या भूमिकेसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माने पूर्णवेळ T20 कर्णधाराची भूमिका बजावली होती. मालिकेतील तीनही टी-20 सामने जिंकल्यामुळे त्याने आपल्या कार्यकाळाची सकारात्मक सुरुवात केली. शर्मा या पदासाठी पात्र असल्याचे सौरव गांगुली यांनी सांगितलं आहे. गांगुली यांनी यापूर्वी असाही दावा केला होता की, त्याने विराट कोहलीला टी-20 कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती परंतु विराटने त्याचे दावे फेटाळून लावले.

बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष गांगुली 'बॅकस्टेज विथ बोरिया' या कार्यक्रमात म्हणाले की, "रोहितने कर्णधार म्हणून जे काही केलं त्यामुळे तो या पदास पात्र आहे. मुंबईसह आयपीएलमध्ये 5 विजेतेपदे आणि दबावाखाली त्याची क्षमता दिसून येते." 

एकदा विराटने ठरवलं की त्याला टी-20 मध्ये भारताचे नेतृत्व करायचं नाही, तेव्हा रोहित हा सर्वोत्तम पर्याय होता. कर्णधार म्हणून त्याने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करून चांगली सुरुवातही केली. या वर्षापेक्षा पुढच्या वर्षी भारतासाठी चांगले परिणाम पाहायला मिळतील अशी आशा असल्याचं, गांगुली यांनी म्हटलंय.

कोहलीने कर्णधारपद सोडल्याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. गांगुली म्हणाला की, भारत 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 वर्ल्डकप चांगला खेळला, पण नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक होती.