लाहोर : पाकिस्तान क्रिकेटवर टीका करणारा वसीम अक्रमचा एक व्हिडिओ शोएब अख्तरने ट्विटरवर शेयर केला आहे. या लिक व्हिडिओमध्ये वसीम अक्रम जे बोलला आहे, त्याला माझा पाठिंबा आहे, असं ट्विट शोएब अख्तरने केलं आहे. या व्हिडिओमध्ये वसीमने पाकिस्तान क्रिकेटमधल्या जुन्या पद्धतींवर टीका केली आहे.
'त्याच त्याच जुन्या पद्धती वापरल्या जात आहेत. बदल घडवण्यासाठी पद्धत आणि विचारही बदलण्याची गरज आहे. ते बऱ्याच गोष्टी बोलतात, पण त्यांची कामगिरी शून्य आहे. हे मला समजत नाही,' असं वसीम अक्रम या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
I support the Leaked Video of Wasim Akram, We need a change.#wasimakram #ShoaibAkhtar pic.twitter.com/OoW6AXfC4u
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) December 26, 2019
२०१९ हे वर्ष पाकिस्तानसाठी निराशाजनक राहिलं. वर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पाकिस्तानचा टेस्ट, वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये पराभव झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ५-०ने मात दिली. इंग्लंडमधल्या वनडे सीरिजमध्येही पाकिस्तानचा ४-०ने पराभव झाला. यानंतर वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्येच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं.
वर्ल्ड कपनंतर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानला विजय मिळवला, पण टी-२० सीरिजमध्ये मात्र त्यांना ३-०ने पराभूत व्हावं लागलं. वर्षाच्या अखेरीस मात्र पाकिस्तानने श्रीलंकेचा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला.
वर्षभरातल्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानी क्रिकेटमध्ये बदल झाले. सरफराज अहमदला कर्णधारपदावरुन डच्चू देण्यात आला. बाबर आजमला टी-२० टीमचं तर अजहर अलीला टेस्ट टीमचं कर्णधारपद देण्यात आलं. मिसबाह उल हकची पाकिस्तानी टीमचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली.