लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिज सुरु करण्याचं समर्थन केलं आहे. दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक संबंध सुरु आहेत. अनेख खेळांमध्ये दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळत आहेत, मग क्रिकेट खेळण्यात काय समस्या आहे? असा प्रश्न शोएब अख्तरने विचारला आहे.
शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनलवर दोन्ही देशांमध्ये क्रिकेट न होण्याला जबाबदार असणाऱ्या लोकांवर नाव न घेता टीका केली आहे. 'जर आपण डेव्हिस कपमध्ये खेळू शकतो. कबड्डी खेळू शकतो तर क्रिकेटमध्ये काय वाईट आहे? जर संबंध संपवायचेच असतील तर व्यापार बंद करा, कबड्डी खेळणं बंद करा. फक्त क्रिकेटच का? जेव्हा क्रिकेटची गोष्ट येते तेव्हा या मुद्द्याचं राजकारण होतं. हे निराशाजनक आहे,' असं शोएब म्हणाला.
भारत-पाकिस्तान सीरिज एखाद्या तटस्थ ठिकाणीही खेळवण्यात येऊ शकते, असा सल्ला शोएब अख्तरने दिला आहे. 'भारतीय टीम पाकिस्तानमध्ये येऊ शकत नाही, हे मी समजू शकतो. पाकिस्तानची टीमही भारतात जाऊ शकत नाही. आम्ही तटस्थ ठिकाणी आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतो. मग दोन्ही देशांची सीरिज का खेळवली जाऊ शकत नाही?', असं सवाल शोएब अख्तरने केला आहे.
'तुम्ही सेहवाग, गांगुली आणि सचिनला विचारा, आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आपल्यातल्या मतभेदाचा परिणाम क्रिकेटवर होता कामा नये. लवकरच दोन्ही देश द्विपक्षीय सीरिज खेळतील,' अशी अपेक्षा शोएबने व्यक्त केली आहे.
'पाकिस्तान सुरक्षित ठिकाण आहे. भारताची कबड्डी टीम आली, त्यांना प्रेम मिळालं. बांगलादेशने पाकिस्तानमध्ये येऊन टेस्ट सीरिज खेळली. पण तरीही कोणाला शंका असेल, तर तटस्थ ठिकाणी मॅच होऊ दे,' अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने दिली. काहीच दिवसांपूर्वी युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदीने दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सीरिज सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती.