Shaheen Afridi T20 World Cup Final: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) पुन्हा चर्चेत आहे. यावेळेस शोएब चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याने सध्याच्या घडीला पाकिस्तानी क्रिकेट संघातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीवर (Shaheen Afridi) केलेली टीका. एका मुलाखतीमध्ये रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीने 2022 च्या टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) जखमी झाल्याने मैदान सोडल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. संपूर्ण षटक न टाकण्याचा शाहीन शाह आफ्रिदीचा निर्णय हा त्याच्या सर्वात वाईट निर्णयांपैकी एक आहे, असं शोएबने म्हटलं.
पाकिस्तानमधील 'सुनो टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शोएब अख्तरने, "टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये जर शाहीन शाह आफ्रिदीच्या जागी मी असतो तर गुडघा दुखतोय म्हणून ओव्हर पूर्ण न करता मैदान सोडून गेलो नसतो. गुडघा नंतर नीट झाला असता. मात्र देशाला विश्वचषक जिंकवून देण्याची संधी खेळाडूच्या करियरमध्ये एकदा किंवा दोनदाच येते," असं म्हटलं आहे.
आपण आफ्रिदीच्या जागी असतो तर मेलो असतो पण ओव्हर पूर्ण करुनच मैदानाबाहेर आलो असतो, असंही शोएब अख्तर म्हणाला. देशासाठी काहीतरी करावं या विचाराने मी काहीही झालं असतं तरी गोलंदाजी केलीच असती, असं शोएबने सांगितलं. "ते 12 मिनिटं, ते 12 चेंडू आणि त्याच 12 चेंडूंमधून मी पाकिस्तानचा सर्वात मोठा स्टार खेळाडू झालो असतो. मी नॅशनल हिरो झालो असतो. मी गोलंदाजी करुन आल्यानंतर मी पडलो असतो आणि फार फार तर ओव्हर संपल्यानंतर माझा गुडघा फ्रॅक्चर झाला असता. माझ्या तोंडातून रक्त येत असतं तरी मी उभा राहिलो असतो," असंही शोएब म्हणाला.
"मी इंजेक्शन घेऊन गुडघ्याच्या इथे भूल देऊन ओव्हर पूर्ण केली असते. लोक म्हणतील तुझा गुडघा कायमचा डॅमेज होईल, तू मरशील तर मी म्हटलं असतं मेलेलं बरं पण वर्ल्डकप दुसऱ्यांच्या हाती जाता कामा नये," अशा शब्दांमध्ये शोएब अख्तरने आपल्या भावना व्यक्त केल्या.
Shoaib Akhtar's statement about Shaheen Afridi. He believes Shaheen should have bowled the two overs against England in the T20 World Cup final through pain to become Pakistan's biggest superstar.
Do you agree with him? pic.twitter.com/wJNaTEkRdG
— Farid Khan (@_FaridKhan) February 20, 2023
टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करुन इंग्लंडने विश्वविजेते पद जिंकलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने 2.1 ओव्हर गोलंदाजी केली. मात्र गुडघा दुखू लागल्याने त्याला नंतर गोलंदाजी करता आली नाही. अचानक हुकूमी एक्का असलेला शाहीन शाह आफ्रिदी मैदानाबाहेर पडल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला होता.