मुंबई : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा टी-20 भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. स्टँडबाय खेळाडू म्हणूनही त्याला टीममध्ये स्थान मिळालं नाही. आता शार्दुल ठाकूरने वर्ल्डकप टीममध्ये निवड न झाल्याची व्यथा मांडलीये. शार्दुल म्हणाला की, वर्ल्डकप खेळणं हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असल्याने तो नक्कीच निराश आहे. शार्दुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कठीण परिस्थितीत संजू सॅमसनसोबत 93 रन्सची भागीदारी करून सामन्यात भारताचं पुनरागमन केलें.
दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी शार्दुल म्हणाला, "साहजिकच ही मोठी निराशा आहे. वर्ल्डकपमध्ये खेळणं आणि चांगली कामगिरी करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. माझी निवड झाली नाही तरी फरक पडत नाही. माझ्यात अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे आणि पुढच्या वर्षी एकदिवसीय वर्ल्डकप खेळायचा आहे. मला कोणत्याही सामन्यात संधी मिळेल, माझं लक्ष्य चांगली कामगिरी करून टीमच्या विजयात योगदान देण्यावर असेल."
दीपक चहरच्या दुखापतीमुळे भारताच्या T20 वर्ल्डकपच्या स्पर्धेला मोठा धक्का बसला आहे. दीपक चहरचा समावेश राखीव खेळाडूंच्या यादीत करण्यात आला असून तो आता ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या वर्ल्डकपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. शार्दुल म्हणाला, 'दुखापत हा खेळाचा भाग असतो. कधी कधी खेळाडू जखमी होईल. आपण ते मनावर घेऊ नये.'
शार्दुल म्हणाला, 'मी बऱ्याच दिवसांपासून माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करतोय. साहजिकच सातव्या ते नवव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीत योगदान देणं चांगलं आहे."
लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 250 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 51 रन्समध्ये चार विकेट गमावल्या होत्या. परंतु सॅमसन नाबाद 86 आणि शार्दुल 33 यांनी भागीदारी करून आशा उंचावल्या. मात्र, त्या सामन्यात भारतीय संघाला नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.