Sport News : आशियाई क्रिकेटचा हा महाकुंभ 27 ऑगस्टपासून सुरू होणार असून भारत-पाकमधील हाय व्होलटेज सामन्याची सर्व क्रीडाप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पकिस्तान संघाचा हुकमी एक्का असलेला गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनुसने भारताच्या टॉप ऑर्डरला हिणवलं आहे.
शाहीन आफ्रिदीच्या बाहेर जाण्यामुळे भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला मोठा दिलासा मिळाला असेल. दुर्दैवाने शाहीनला आशिया चषक स्पर्धेत पाहू शकणार नाही. चॅम्पियन लवकर ठीक हो, असं वकार युनुसने म्हटलं आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केलं आहे.
गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यांमध्ये शाहीन आफ्रिदीच्या धारदार गोलंदाजीने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडलं होतं. कारण त्याने भारताचे आघाडीचे खेळाडू के. एल. राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाद केलं होतं. पाकिस्तानने तो सामना 10 विकेट्सने जिंकला होता.
वकारने भारतीय संघावर टीका केल्यामुळे सोशल मीडियावर त्याला क्रीडाप्रेमींनी ट्रोल केलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील इतिहासाची आठवण भारतीय प्रेक्षकांनी करून दिली आहे. 28 ऑगस्टला भारत आपल्या पराभवाचा बदला घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.