Kavita Raut : आंतरराष्ट्रीय धावपटू आणि सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविता राऊतची (Kavita Raut) शासकीय नोकरीची (Government Job) प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कविता राऊतला लवकरच सरकारी नोकरी मिळणार असून महाराष्ट्र सरकारच्या क्लासवन सेवेत दाखल करुन घेतलं जाणार आहे. आदिवासी शिष्टमंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा निर्णय घेतला आहे. कविता राऊतची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे आदिवासी शिष्टमंडळांनी (Tribal delegations) त्यांचे आभार मानले असल्याची माहिती मिळालीय.
कविता राऊतचे गंभीर आरोप
'मी आदिवासी असल्याने जातीची शिकार झाले असून, मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप कविता राऊत यांनी सरकारवर केला होता. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा एका छोट्या आदिवासी पाड्यावरील या मुलीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकचे नाव उंचावलं. आशियाई क्रीडा स्पर्धेवर मोहोर उमटविणाऱ्या कविता राऊतने 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्वह केलं होतं. क्रीडा जगतात मानाचा समजला जाणारा अर्जुन पुरस्कारही तिने मिळवला. मात्र अद्याप कॅटेगिरीत असूनही ती शासकीय नोकरीविना होती.
कविता राऊत सध्या ओएनजीसी कंपनीत तामिळनाडूमध्ये कार्यरत आहे. तिने गेल्या आठ वर्षापासून शासकीय नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न केला. क्लास वन राजपत्रित अधिकाऱ्याची नोकरीची तिची मागणी होती. शिक्षण कमी असल्याचं सांगत तिला डावललं गेलं. पदवी शिक्षण नसल्याने तिच्यासोबत ललिता बाबरला नोकरी मिळाली नाही. मात्र नंतर ललिता आणि कविताने आपलं शिक्षण पूर्ण केलं. ललिता बाबरला डेप्युटी कलेक्टर म्हणून सामावून घेण्यात आलं.
मात्र कविताला नेहमीच क्लास थ्री पदाची ऑफर देत उपेक्षित वागणूक देण्यात आली. इतर महाराष्ट्र केसरी कुस्तीपटूंना शासनाने पोलीस विभागात सहभागी उच्चपदावर रुजू करून घेतलं . मात्र तिने आपल्या जातीमुळे आपल्याला उपेक्षित भांडण असल्याचे आरोप केले. याबाबत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांना विचारणा केली असता त्यांनी लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिलं होतं.
सावरपाडा एक्सप्रेस असे नावलौकिक मिळवलेल्या कविताच्या संघर्षमय प्रवासावरील पाठ पाचवीच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमातही सहभागी करून घेण्यात आला आहे.. मात्र याच आंतरराष्ट्रीय धावपटू कवितावर झालेला अन्याय सरकार कधी दूर करणार असा प्रश्न विचारला जात होता. आता उशीरा का होईना सावरवाडा एक्स्प्रेस कविता राऊतला न्याय मिळणार आहे.