आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकदाही आऊट न झालेला भारतीय

 क्रिकेटच्या मैदानात रोजच नवीन रेकॉर्ड बनत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात.

Updated: Jul 24, 2018, 09:16 PM IST
आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकदाही आऊट न झालेला भारतीय title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात रोजच नवीन रेकॉर्ड बनत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात. पण यातली अनेक रेकॉर्ड क्रिकेट रसिकांच्या लक्षातही राहत नाहीत. भारतीय टीममध्ये एक असाही खेळाडू होता जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाही आऊट झाला नाही. सौरभ तिवारी असं या खेळाडूचं नाव आहे. सौरभ तिवारीनं आत्तापर्यंत ३ आंतरराष्ट्रीय वनडे मॅच खेळल्या. या मॅचमध्ये कोणत्याही बॉलरला तिवारीला आऊट करता आलं नाही. सौरभ तिवारी २०१० नंतर एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेला नाही. यावर्षीच्या आयपीएलमध्ये मुंबईनं सौरभ तिवारीला ८० लाख रुपये देऊन विकत घेतलं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण

सौरभ तिवारीनं २० ऑक्टोबर २०१० साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या मॅचमध्ये तिवारीनं छोटी पण महत्त्वाची खेळी केली. मायकल क्लार्कनं नाबाद १११ रन केल्यानंतर ऑस्ट्रेलियानं ३ विकेट गमावून २८९ रन केल्या होत्या. महेंद्रसिंग धोनी शून्य रनवर आऊट झाल्यानंतर सौरभ तिवारी बॅटिंगला आला होता. तिवारीनं १७ बॉलमध्ये १२ रन केल्या. यामध्ये दोन फोरचा समावेश होता. या मॅचमध्ये रैनानं ४७ बॉलमध्ये नाबाद ७१ रनची खेळी केली होती.

दुसऱ्या वनडेमध्येही सौरभ नाबाद

सौरभ तिवारीला दुसरी संधी ७ डिसेंबर २०१० साली मिळाली. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तिवारी न्यूझीलंडविरुद्धची मॅच खेळला. न्यूझीलंडनं पहिले बॅटिंग करत ३१५ रन केले. यानमंतर युसुफ पठाणनं ९६ बॉलमध्ये नाबाद १२३ रनची खेळी केली. पठाणनं त्याच्या खेळीमध्ये ७ फोर आणि ७ सिक्स मारले होते. या मॅचमध्ये तिवारीनं युसुफला चांगली साथ दिली. तिवारीनं ३९ बॉलमध्ये ३ फोर आणि १ सिक्सच्या मदतीनं नाबाद ३७ रन केले आणि भारताला विजय मिळवून दिला. ही मॅच भारतानं ५ विकेटनं जिंकली.

तिसऱ्या मॅचमध्ये मिळाली नाही बॅटिंग

सौरभ तिवारी त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच १० डिसेंबर २०१६ साली चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला. पण या मॅचमध्ये तिवारीला बॅटिंगची संधी मिळाली नाही. या मॅचमध्ये न्यूझीलंडची टीम २७.१ ओव्हरमध्ये १०३ रनवर ऑल आऊट झाली. भारतानं ही मॅच २१.१ ओव्हरमध्ये ८ विकेटनं जिंकली.